दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा काळवंडत चालला आहे…
गेल्या दोन दशकापासून महाराष्ट्र नासवण्याचे ऐतिहासिक काम, या राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी केले व आजही करतच आहेत. त्यामुळे एकेकाळी पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचा चेहरा पार काळवंडला गेला आहे.भगवा की हिरवा, अशा वादामुळे आपण एकमेकांकडे आता संशयाने पाहायला लागलो आहोत, ही बाब राज्याच्या पिछेहाटीला कारणीभूत ठरली आहे.या सर्व गदारोळात माझ्या तिरंगाचा कोणीच कसा विचार करत नाहीत,असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उभा ठाकला आहे. आज, आपण सारे एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचलो आहोत.भारतीय संविधानात हिरवा किंवा भगवा या दोन्ही शब्दाला स्थान नसताना मात्र ज्या लोकांनी राज्य नासवण्याचा विडा उचलला आहे, अशांना संविधानाशी कोणतेही देणेघेणे नाही. आपल्या देशात,सरकार संविधान बदलणार, असे जेंव्हा कानावर पडते, त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना आपल्या लोकशाही व्यवस्थेचे काय होणार ? अशी काळजी वाटते.आपल्या संविधानाला साधा ओरखडा जरी आला तर देशभरात वादळ उठेल, पण त्याची जाणीव राज्यकर्त्यांना नाही. त्यामुळे हिरवा – भगवा या वादाला खतपाणी घालण्याचे दळभद्री काम ते करत असतात. ” हिरवा ने कैसा हराया, ” हे वाक्य उच्चारणाऱ्या लोकप्रतिनिधिने याचे पडसाद कसे उमटतील, याचा सारासार विचार करायला हवा होता. हा वाद थांबावा यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ही आग अधिक भडकावी, यासाठी आगीत तेल टाकण्याचे काम केले.
आपल्या आजूबाजूच्या देशात सध्या काय चालले आहे,यावर एक नजर टाकल्यास हिरवा – भगवा हा वाद किती धोकादायक आहे,हे आपल्याला नक्कीच जाणवेल.ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा येथे निकालानंतर जो वाद निर्माण झाला,तो निरर्थक असून दोन समाजात दुही माजवणारा आहे.दुर्देवाची बाब अशी की या वादात अनेक राजकीय नेत्यांनी ताळतंत्र सोडून बेलगाम वक्तव्ये केली.अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.आपल्या तिरंग्यात हिरवा,पांढरा व भगवा, असे तीन रंग आहेत.समता, शांती व बंधूभाव याचे प्रतीक म्हणजे आमचा तिरंगा होय.या तिरंग्यातील हिरवा व भगवा बाजूला काढण्याचा अधिकार या लोकांना कोणी दिला ? याचा विचार प्रत्येक नागरिकाने करायला हवा.या तीन रंगासाठी लाखो देशप्रेमी नागरिकांनी आपले रक्त सांडले आहे.ज्यांनी या तिरंग्यासाठी आपल्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवले,त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे तरी विस्मरण होऊ देऊ नका.तिरंग्यातील या तीन रंगापैकी एकही रंग या नतद्रष्ट लोकांना बाजूला काढता येणार नाही,कारण आमचा तिरंगा हा ” आन,बान व शान,” चे प्रतिक आहे.त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला जाईल,असा नतद्रष्टपणा करणे,निदान आता तरी थांबवा…

