दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
गणेश नाईक यांचा बोलवता धनी कोण ?
गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.एकाच मंत्रिमंडळात असलेल्या दोन ज्येष्ठ मंत्र्यामध्ये असलेला बेबनाव दररोज समोर येऊ लागला आहे.वनमंत्री गणेश नाईक हे तर ताळतंत्र सोडत शिंदे यांना लक्ष्य करत आहेत.तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या कुरापतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.मात्र,त्यांचे सहकारी ( संजय शिरसाट,प्रताप सरनाईक व शंभूराज देसाई ) मात्र गणेश नाईक यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.ही सारी मंडळी दर बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळतात.जनतेचे सामूहिक नेतृत्व करताना ही मंडळी संविधानाने आखून दिलेली मर्यादा ओलांडून एकमेकांना लक्ष्य करत असतात,हे कितपत योग्य आहे.याविषयी लोकांनी आता जाब विचारायला हवा.
वनमंत्री गणेश नाईक हे ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ले चढवत आहेत,ते पाहिल्यानंतर त्यांच्या अशा बेधुंद वागण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कीच फूस आहे,असे जाणवू लागले आहे.अन्यथा गणेश नाईक अशाप्रकारचे धाडस करूच शकत नाहीत.ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी,अशी नाईक यांची इच्छा आहे.काही वर्षांपूर्वी गणेश नाईक यांचे चिरंजीव संजय नाईक हे या ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते.पण,त्यानंतर मात्र शिवसेनेने ठाण्याची जागा आपल्याकडे खेचून घेतली होती.तेंव्हापासून या मतदारसंघावर शिवसेनेची पकड आहे.त्यामुळे गणेश नाईक यांची सध्या आदळापट सुरू आहे.अशावेळी शिंदे गटाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आपला झेंडा पुन्हा फडकावला.त्यामुळे गणेश नाईक यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आहे.सोबत कल्याण – डोंबिवली महानगरपालिकाही शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे.शिंदे गटाचे ठाणे जिल्ह्यात असलेले वर्चस्व हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व वनमंत्री गणेश नाईक या तिघांच्या पचनी पडणारे नाही.त्यामुळे या त्रिकुटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव डॉ.श्रीकांत शिंदे यांना घेरण्यास सुरुवात केली आहे.

