दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
महाड हिंसाचार ; उच्च न्यायालयाने सरकारची लक्तरे वेशीला टांगली,
रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या सत्तास्पर्धेत जे रणकंदन सुरु आहे,त्याला आवर घालण्याऐवजी सरकार व आपली पोलीस यंत्रणा खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या नगरपरिषद निवडणूकी दरम्यान महाड येथे शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) यांच्यामध्ये झालेल्या राड्यावरुन उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहखाते व भरत गोगावले यांना
सुणावणी दरम्यान चांगलेच झापले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यावर टीप्पणी केली आहे.” राज्याचे मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत का ? ते आपल्याच युतीमधील पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवरू शकत नाहीत,” अशाप्रकारचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सरकार आणि प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.या राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश यांच्यासह माजी आ.माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.पण या प्रकरणी भरत गोगावले यांच्या मुलाला अटक करण्यात पोलिसांनी टाळाटाळ केल्याचे दिसून आल्यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.
महाड शहरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर विकास गोगावले याने महाड पोलिसासमोर आत्मसमर्पण केले.
” आपला मुलगा फरार नसून आपल्या संपर्कात असल्या, ” चे भरत गोगवलेच्या वक्तव्याची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.सरकार कोणालाही २४ तासात अटक करू शकते, पण जेव्हा त्यांना अटक करायची नसते,तेव्हा सरकार प्रतिज्ञापत्रे सादर करत असते. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रभावित झाल्याचे उच्च न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले आहे.सत्तेत असलेल्या पक्षांचे कार्यकर्ते जर उघडपणे शस्त्रांचा वापर करत असतील आणि कायदा हातात घेत असतील, तर पोलीस प्रशासन काय करत होते ? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.
दरम्यान सरकारी वकिलांच्या विनंतीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी सुरू होण्यापूर्वी गुन्हा दाखल झालेल्यांना आत्मसमर्पण करण्यास सरकारने सांगावे, असे न्यायालयाने आदेश दिले. त्यानंतर अवघ्या २४ तासात भरत गोगावले यांचा ५२ दिवस फरार असलेला मुलगा विकास हा सकाळी ११.०० वाजता महाड पोलीस ठाण्यात मागच्या दाराने हजर झाला.
गेल्या डिसें.मध्ये नगरपरिषद निवडणुक मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेल्या राड्यानंतर दोन्हीकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.याप्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.आतापर्यंत पोलिसांनी दोनही गटातील सहाजणांना ताब्यात घेतले आहे.
मंत्र्याचा मुलगा असल्यामुळे महाड पोलीस त्याला अटक करत नव्हते.तसेच मंत्रिमंडळातील एक मंत्री आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलाला पाठीशी घालतो व पोलीस त्यांना साथ देतात. वास्तविक ” आपला मुलगा फरार नसून तो आपल्या संपर्कात असल्या, ” चे एक मंत्री जाहीरपणे सांगतो, तेंव्हा पोलिसांनी त्या मंत्र्याचा जबाब नोंदवणे, हे कायद्याने बंधनकारक होते.पण या प्रकरणी गोगावले,पोलीस व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांची भूमिका संशयास्पद अशीच होती.एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस फरार झालेल्या आरोपीच्या नातलगाना चौकशीसाठी घरातून उचलून नेतात व थर्ड डिग्री देत असतात.येथे तर एक मंत्री जाहीरपणे सांगतो की ” माझा मुलगा फरार नसून माझ्या संपर्कात आहेत, ” मग पोलीस काय करत होते ? अशी चर्चा महाड तालुक्यात होत आहे.

