दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना शिंदे पिता – पुत्राने घाम फोडला…
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय कोणाला फायदेशीर ठरला ? याविषयी चाचपणी केली असता उद्धव ठाकरे यांचे या निवडणुकीत फार मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला ६१ हा आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाला ९ जागा कमी पडत आहेत.त्यामुळे मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी मनसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक गळाला लावले आहेत.दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणखी दोन नगरसेवक बेपत्ता झाले आहेत.त्यामुळे ५३ नगरसेवक असलेल्या शिंदे गटाला ६१ हा बहुमताचा आकडा गाठणे आता सहजशक्य होणार आहे.उद्धव व राज या ठाकरे बंधूंचे एकत्र येणे आणि दुसरीकडे मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देणे,हे एक न सुटणारे कोडे आहे.
या सर्व घडामोडीमुळे शिवसेनेचे ( उबाठा ) संख्याबळ हे आता अकरा वरून सातवर आले आहे.तर मनसेचे संख्याबळ पाचवरून सात झाले आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगरपालिका क्षेत्रात राहतात,त्यांना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या होमग्राऊंडवर धोबीपछाड दिला आहे.एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ.श्रीकांत शिंदे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण या दोघांमधून विस्तव जात नाही.अशा परिस्थितीत चव्हाण यांची सत्तास्पर्धेत होत असलेली पीछेहाट त्यांना राजकीयदृष्ट्या त्रासदायक ठरणारी आहे.भाजपचे अन्य एक मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना ठाण्यात घेरण्याचा प्रयत्न केला,पण शिंदे त्यांना पुरून उरले.मात्र याच शिंदे यांनी नवी मुंबईत करून दाखवल्यामुळे भाजपला नवी मुंबई व कल्याण – डोंबिवली या दोन महानगरपालिकेत शिंदे पिता – पुत्राने घाम फोडल्याचे स्पष्ट होत आहे.दुसरीकडे या दोघांनी मनसेला गळाला लावल्यामुळे राज व उद्धव यांच्या एकत्र येण्यावर आता काळे ढग जमू लागले आहेत.

