दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मुंबईच्या मतदारांनी ठाकरे बंधूना का झिडकारले ?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी बहुमतासाठी आवश्यक असलेला ११४ चा जादुई आकडा ठाकरे बंधूना गाठू दिला नाही.अर्थात या शहराच्या महापौरपदी महायुतीची व्यक्तीच विराजमान होणार आहे.८९ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे,तर शिवसेना ( उबाठा ) ६५ जागासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.तर शिंदे यांच्या गटाला २९ जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २४,एआयएमआयएम -०८,मनसे -०६,राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) – ०३,समाजवादी पक्ष – ०२ व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) – ०१,अशी क्रमवारी आहे.
भाजप व शिंदे यांच्या आक्रमणाला रोखण्यासाठी उद्धव व राज हे दोघे ठाकरे बंधू आपल्यातील मतभेदाना मूठमाती देत एकत्र आले.पण,या दोघा ठाकरे बंधूंना मुंबईकरानी झिडकारले. मराठी माणूस/ मराठी अस्मिता व मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र,अशा तीन संवेदनशील मुद्द्यावर फुंकर मारत या दोघा भावांनी भाजपला लगाम घालण्याचा प्रयत्न केला,पण मुंबईतील बहुभाषिक समाजाने त्यांचे मनसुबे पार उधळून लावले. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत जबर किंमत चुकवावी लागली आहे.मनसे सोबत आल्यामुळे उत्तर भारतीय, गुजराती,मारवाडी,जैन व दाक्षिणात्य समाजाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासून फारकत घेतली व त्यांचा घोडा ६५ जागांवर अडखळला.हातातून निसटलेल्या किमान २० ते २५ जागा या भाजप व शिंदे गटाच्या पारड्यात गेल्या.त्यामुळे भाजपला रोखण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गेले.
वास्तविक या दोघा ठाकरे बंधूनी मराठी माणसाच्या या भावनिक प्रश्नाला हात घालण्यापूर्वी आपली स्वतःची राजकीय कारकीर्द तपासून पाहायला हवी होती.मराठी माणूस हा मुंबईबाहेर कसा फेकला गेला,याच्या खोलात शिरून पाहिल्यास त्यांना वास्तव कळू शकले असते.गिरणी कामगार या शहरातून परागंदा का व कसा झाला ? याचा शोध घेतला तर सर्वांच्या नजरा शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तत्कालीन नेत्याकडे वळतात.कामगार नेते स्व.डॉ.दत्ता सामंत यांना कोणत्याही परिस्थितीत डोके वर काढता येऊ नये,यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी गिरणी मालक संघाला हाताशी धरून गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप चिरडला. या दुष्कर्मात त्यांना सेनेने साथ दिली होती, त्यामुळे मराठी माणूस मुंबई शहरातून कायमचा हद्दपार झाला.आज ठाकरे बंधू भाजपच्या नावाने गळा काढत असले तरी,खरे वास्तव हेच आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,यासाठी सेना,मनसे व काँग्रेसने किती प्रयत्न केले व त्याला किती यश मिळाले हे जगजाहीर आहे.भाजपने वर्षभरापूर्वी या संवेदनशील विषयाला हात घातला व वर्षानुवर्षे खितपत पडलेला प्रश्न चुटकीसरशी मार्गी लावला.
भाजपकडून मुंबई केंद्रशासित करण्याचे प्रयत्न होत असले तरी, या परिस्थितीला शिवसेना व मनसे हे दोघेही तितकेच जबाबदार आहेत.तसेच गेल्या दहा ते बारा वर्षात राज ठाकरे यांची भूमिका सतत बदलत राहिल्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास पार उडाला आहे.तसेच उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी २०१९ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी केलेले साटेलोटे देखील मुंबईकरांच्या पचनी पडले नाही.अदानी व अंबानी यांच्या नावाने शंख करणारे नेते प्रत्यक्षात या दोन उद्योगपतीसाठी कशा पायघड्या पसरत असतात,हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.त्यामुळे गेल्या पाच वर्षात या दोन्ही ठाकरे बंधूचे अनेक सहकारी त्यांच्यापासून दूर गेले.या अशा परिस्थितीमुळे या निवडणुकीत भाजपने बाजी मारली.

