दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
जल,जमीन व जंगल ; अस्मानी संकट घोंगावण्यास सुरुवात,
गेल्या काही वर्षात मानवाने जल,जमीन व जंगलाचे लचके बेसुमार पद्धतीने तोडले.त्याचे दृष्यपरिणाम आता दिसू लागले आहेत.मानवी जीवनात या तिन्ही नैसर्गिक संसाधनांला अनन्यसाधारण महत्व असताना,मूठभर धनदंडग्यांना झुकते माप देत सरकारने सध्या मानवाला देशोधडीला लावण्याचे धोरण अवलंबले आहे.जमिनीची भूक काही मिटता नाही,तर ९० च्या दशकापासून जल व जंगल यावर सरकार व उद्योगसमूहांची वक्रदृष्टी पडू लागली आहे.त्यामुळे अवघ्या ४० वर्षात ही सारी नैसर्गिक संसाधने हळूहळू इतिहासजमा होऊ लागली आहेत.” विकासासाठी जमिनीचे संपादन,” या गोंडस नावाखाली शेती/ बागायतीच्या सुपीक जमीनी सरकारने बहुराष्ट्रीय उद्योगसमूहांच्या घश्यात घालण्याचे धोरण अवलंबले.सरकारच्या या विनाशकारी धोरणामुळे ग्रामीण भागातील भूमिपुत्र पार उध्वस्त झाला.गेल्या काही दिवसांपासून वसईच्या समुद्रात रिंगण तयार झाले असून या रिंगणात आता बोटी अडकू लागल्या आहेत.त्यामुळे समुद्राचा राजा,अशी ओळख असलेला मच्छीमार सध्या भितीच्या सावटाखाली आला आहे.या घटनेच्या मागची कारणे शोधण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाल्या असल्या तरी सरकार दरबारी अद्याप दखल घेतली गेली नाही.

तसेच जंगलातील बेसुमार वृक्षतोड,अतिक्रमणे व ध्वनीप्रदूषण यामध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे जंगलातील हिंस्त्र जनावरे आता जंगले सोडून नागरी वसाहतीमध्ये शिरू लागली आहेत.ही हिंस्त्र जनावरे मौजमजा म्हणून नागरी वसाहतीमध्ये फेरफटका मारण्यासाठी जंगलातून बाहेर पडत नाहीत.तर त्यांची ही भटकंती ही खाद्य व पिण्याच्या पाण्याच्या शोधात सुरू झाली आहे.जंगलातील खाद्य व जलसाठे कमी होत गेल्यामुळे हा धोका निर्माण झाला आहे.जंगलात सुरू झालेल्या या मानवी गजबजाटामुळे जनावरांसाठी आवश्यक असणारी शांतता लोप पावली व आज स्वतःहून ओढवून घेतलेल्या या संकटाला आपण सामोरे जात आहोत.
समुद्रातील अतिक्रमणे, प्रदूषण व तेलसंशोधनाचा हव्यास,अशा तीन महत्वाच्या कारणामुळे समुद्रधनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारा मच्छीमार समाज भितीच्या सावटाखाली आला आहे.तेलविहिरीचे वाढते क्षेत्र,समुद्रात होत असलेला प्रचंड मातीभराव,वाढते प्रदूषण तसेच समुद्रकिनारी महाकाय तसेच विनाशकारी प्रकल्प लादण्याचा सरकारचा अट्टाहास,अशा विविध कारणांमुळे भविष्यात मानवाला फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून वसईच्या समुद्रात रिंगण तयार झाले आहे.या रिंगणात एक मासेमारी बोट अडकून पडली होती.तिला वाचवण्यासाठी इतर मच्छीमारांनी आपल्या जीवाची बाजी लावून ती बोट कशीबशी खेचून आणली.या भागात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे गोल आकाराचे रिंगण तयार झाले आहे. त्या रिंगणातून मातीच्या रंगाचे पाणी बाहेर फेकले जात आहे.हे रिंगण कसे तयार झाले,याचा शोध घेण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत,पण आठ दिवस उलटल्यानंतरही त्याचा शोध लागलेला नाही.

काही वर्षांपूर्वी मुंबईतील बॅकबे उभारणीसाठी झालेल्या मातीभरावामुळे समुद्राचे पाणी आता समुद्रकिनारी असलेल्या गावाच्या दिशेने सरकू लागले आहे.त्यामुळे अर्नाळा समुद्र किनारी असलेल्या मच्छीमारांच्या राहत्या घरांची दरवर्षी नासधूस होत असते.अशा या जल,जंगल व जमिनीच्या संकटामुळे भविष्यात मानवजात अडचणीत येण्याची शक्यता आहे.

