दीपक मोहिते,
” फ्रँटलाईन,”
एकनाथ शिंदे व अजित पवार यांची सध्याची अवस्था ” सहनही होत नाही,आणि सांगताही येत नाही,”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व शिवसेनेचा ( एकनाथ शिंदे गट ) चांगलाच बोलबाला राहिला.त्यांच्या युतीने २९ पैकी २६ महानगरपालिका जिंकत शहरी भागातही आम्हीच ” दादा,” असल्याचे दाखवून दिले आहे.त्यांच्या महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीत साफ पालापाचोळा झाला.ज्या पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका जिंकण्याची त्यांनी स्वप्ने पाहिली होती,ती भाजपने पार धुळीला मिळवली.अजित पवार यांचा उद्धटपणा, सहकारी मंत्र्यांचा मनमानी कारभार व मुलाचे प्रताप,अशा तीन कारणामुळे देवाभाऊंने या निवडणुकीत त्यांना उखडून फेकून दिले.
ज्या सत्तेसाठी एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनी आपल्या पक्षात बंडखोरी करत पक्षाची वाताहत केली,आज त्यांचीही तशीच स्थिती झाल्याचे पाहायला मिळत आहे.तीन वर्षांपूर्वी आपले आमदार माघारी फिरू नये,यासाठी मुंबई – सुरत व्हाया गुवाहाटी करणाऱ्या शिंदे याना व त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये लपून राहावे लागत आहे.हा त्यांच्यावर नियतीने उगवलेला सुड आहे,असेच म्हणावे लागेल.” जो भाजप सोबत गेला,त्याचा कार्यभाग संपला,” हे आजवर आलेल्या अनुभवावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.भाजप हा इतर पक्षाना सोबत घेऊन त्या पक्षाचे खच्चीकरण करतो,हे माहीत असूनही शिंदे व पवार हे दोघेही त्यांच्या नादी लागले.आता अजित पवार यांची पावले पुन्हा रॉयलस्टोनच्या दिशेने वळू लागली आहेत.पण,आता ते शक्य नाही,कारण,आज शरद पवारांचा राष्ट्वादी पक्ष देखील सरणावर पोहोचला आहे.तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनाही अधूनमधून आपल्या गावाकडचे शेत सतत खुणावत असते.एकंदरीत ही सर्व परिस्थिती लक्षात घेता भाजपने इतर पक्ष नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र यशस्वीपणे अमलात आणल्याचे जाणवते.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,दोन्ही शिवसेना,दोन्ही राष्ट्रवादी,मनसे व वंचित बहुजन आघाडी हे सारे राजकीय पक्ष आता शेवटचे आचके देऊ लागले आहेत.फेब्रु.महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही अशीच स्थिती पाहायला मिळणार आहे.पुणे वगळता कोकण,नाशिक,औरंगाबाद,
अमरावती व नागपूर या सर्व सहा उपविभागात या लोकांची भाजपसमोर डाळ शिजणार नाही.शिंदे व पवार यांच्या पक्षात असलेले गुंड प्रवृत्तीचे लोक व त्यांचे उघडकीस आलेले कारनामे लक्षात घेता भाजपची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारवंत गटामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.लोकसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसल्यानंतर पक्षाचे मुखपत्र असलेल्या ” ऑर्गनायझर,” पाक्षिकाने भाजपच्या राज्य नेतृत्वावर टीकेची झोड उठवली होती.शिंदे यांना सोबत घेण्यासंदर्भात या गटाचा आक्षेप नव्हता,पण अजित पवार यांना सोबत घेण्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली,असे या गटाचे म्हणणे होते.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आटोपल्यानंतर भाजप या दोघांना जेवणातील कडीपत्याप्रमाणे ताटाच्या बाहेर फेकून देतील.या निवडणुकीत भाजपने पुणे जिल्ह्यात अजित पवार यांना कात्रजचा घाट दाखवल्यामुळे शिंदे गट आता सावध झाला आहे.पण आता त्याचा काहीही उपयोग होणार नाही,कारण गेल्या चार वर्षात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे.

