दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मायबाप सरकारच भूमिपुत्रांना उध्वस्त करू पाहत आहे…
गेल्या काही वर्षात केंद्र व राज्य सरकारने पालघर जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारे अनेक विनाशकारी प्रकल्प लादले.या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी संपादीत करताना अनेक भूमीपुत्रावर भूमिहीन होण्याची पाळी आली.सरकार त्यांच्या केवळ जमिनी संपादित करण्यावर थांबले नाही,तर त्यांनी समुद्रातही अतिक्रमण केले.शेतकरी भूमिहीन तर मच्छीमार समाज रोजगारापासून वंचित अशी परिस्थिती या जिल्ह्यात निर्माण झाली.यासर्व प्रकल्पामध्ये वाढवण बंदर व्यतिरिक्त मुरबे येथे नव्याने होऊ घातलेले जिंदाल उद्योग समूहाचे प्रस्तावित खाजगी बंदर,रिलायन्स टेक्स्टाईल पार्क,समृद्धी व मुंबई – वडोदरा द्रुतगती मार्ग,प्रस्तावित विमानतळ व चौथी मुंबई,तसेच यापूर्वी झालेले तारापूर अणू ऊर्जा प्रकल्प टप्पा – १ व टप्पा – २,याचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काल शेतकरी,मच्छीमार,
कष्टकरी आदिवासी रस्त्यावर उतरला व त्याने रुद्रावतार धारण केले.आज पालघर जिल्ह्यातील अनेक जमिनीवर शहरी भागातील धनदांडग्या उद्योगपतींची नजर पडली आहे.वसईतील तुंगारेश्वर जंगलातील वनजमीन एका उद्योगपतीच्या घश्यात घालण्यासाठी राज्य सरकारने पायघड्या पसरण्यास सुरुवात केली आहे.स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात भरमसाठ मोबदला देऊन सरकारकडून त्यांना अक्षरशः नागवले जात आहे.डहाणू तालुका हा ” इको सेन्सेटिव्ह झोन,” असूनही केंद्र सरकारने पर्यावरणाला मारक असलेला महाकाय विनाशकारी ” वाढवण बंदर प्रकल्प जुलूम व जबरदस्ती करत तसेच स्थानिक भूमीपुत्राचा विरोध असतानाही पालघरवासीयांच्या माथी मारला.सरकार या सर्व प्रकरणी केवळ भरमसाठ मोबदला देऊन विस्थापितांची बोळवण करत आहे.पण,या विस्थापित होणाऱ्या भूमीपुत्राचे पुनर्वसन व त्यांच्या मुलाबाळांच्या रोजगाराचे काय ? या प्रश्नाचे उत्तर आपल्या मायबाप सरकारकडे नाही.मुंबई खाली झाली,आता हाकेच्या अंतरावर असलेल्या व निसर्गरम्य वनसंपदनेने नटलेल्या पालघर जिल्ह्याच्या जीवावर केवळ उद्योगपतीच नाही तर सरकारच उठले आहे.यावरून आपली व्यवस्था उद्योगपतींच्या दावणीला किती बांधली गेली आहे, हे स्पष्ट होत आहे.वास्तविक सरकारने रयतेच्या जीवनात उष:काल व्हावा,साठी प्रयत्नशील असायला हवे,पण आपले सरकार मात्र त्यांच्या जीवनात काळरात्र आणण्यासाठी दिवसरात्र जुंपलेल्या धनदांडग्या उद्योगपतींसाठी पायघड्या घालत आहे.त्यामुळे काल सरकारच्या निषेधार्थ मच्छिमार,आदिवासी व अन्य समाजाचे हजारो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले व त्यांनी एल्गार पुकारला.

