दीपक मोहिते,
वसई विरार उपप्रदेशात ” ऑपरेशन लोटस,” राबवणे,हा आततायीपणा ठरेल…
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते माजी हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः जातीने कुरुक्षेत्रात उतरून भाजपला यशस्वीपणे रोखले व सत्ता स्थापणे इतपत बहुमत मिळवले.पण,आता भाजप बहुजन विकास आघाडीच्या काही नगरसेवकांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे ” ऑपरेशन लोटस,” या वसई विरार उपप्रदेशात फुलणे कदापी शक्य नाही.त्यांनी तसा प्रयत्नही करू नये.बहुजन विकास आघाडीतून जी नाराज मंडळी भाजपमध्ये गेली, त्यांना वसईच्या मतदारांनी साफ नाकारले.हे केवळ ठाकूर रणांगणात स्वतः जातीने उतरल्यामुळे शक्य झाले.जर या निवडणुकीची धुरा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवली असती,तर मात्र बविआचे काही खरं नव्हते.गेल्या विधानसभा निवडणुकीत नेमकी त्यांनी हीच चूक केली व स्वतःवर अस्मानी संकट ओढवून घेतले.
फोडाफोडीच्या राजकारणाला वसई – विरार उपविभागातील जनता थारा देत नाही,हे या निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले आहे.त्यामुळे भाजपने नको त्या भानगडीत न पडता आपला पराभव खिलाडूवृत्तीने स्विकारायला हवा.ऐन मोक्याच्या वेळी नाराज मंडळींनी वेगळा मार्ग का स्विकारला,याचा ठाकूर यांनीही विचार करायला हवा.या लोकांनी पक्ष का सोडला ? यावर विचारमंथन व्हायला हवे.सोडून गेलेल्या मंडळींचा ठाकूर यांच्या विषयी मनात किंचितही किल्मिष नाही,पण पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत ही नाराजी होती.ती या निवडणुकीनंतर उफाळून वर आली.सोडून गेलेल्या लोकांचे म्हणणे ठाकूर यांनी ऐकून घेतल्यास खालच्या स्तरावर काय चालले आहे,हे त्यांना नक्कीच कळू शकेल.भाजपनेही ही बाब लक्षात घेऊन ” ऑपरेशन लोटस,” सारखा प्रकार निदान या उपविभागात करता कामा नये.विधानसभा निवडणुकीत गाफील राहणारे ठाकूर हे फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेऊ शकतात,हे २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात विरोधकांना पाहायला मिळाले.भाजपने कितीही उड्या मारल्या तरी ” ऑपरेशन लोटस,” येथे शक्य होणार नाही.त्यांनी या उचापती करण्यापेक्षा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करायला हवे.जागृत व सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्यांनी प्रशासन व सत्ताधारी पक्षावर वचक ठेवला तर त्यांना या उपप्रदेशातील जनतेची साथ मिळू शकते.दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने देखील ” झालं गेलं गंगेला मिळाले,” या उक्तीनुसार आपला कारभार करावा.आपल्याला प्रशासनावर पोलादी पकड कशी बसवता येईल.परिसर विकासाला चालना देण्यासाठी सत्ताधारी व विरोधक यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे.गेल्या दहा वर्षात या महानगरपालिकेत नोकरशाहीने जे दिवे लावले,ते या दोघांनी लक्षात घेऊन पावले उचलायला हवीत.

