दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नॅशनल डेस्कसाठी…
आता सर्वच राजकीय पक्षासमोर आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.पहिल्या टप्यात नगरपरिषदा व नगर पंचायती व दुसऱ्या टप्यात महानगरपालिका,अशा निवडणूका पार पडल्या.या निवडणुकामध्ये अपेक्षेप्रमाणे महायुतीमधील भाजपने घवघवीत यश मिळवले.एकूण २९ महानगरपालिकापैकी भाजपने ठाणे,लातूर,भिवंडी व वसई – विरार या चार महानगरपालिका वगळता सर्वच्या सर्व आपल्या खिश्यात घातल्या.ठाणे येथे शिंदे गटाने वर्चस्व मिळवले तर भिवंडी, लातूर व परभणी या तीन महानगरपालिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे गेल्या.
या निवडणुकीत देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागले होते.या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव व राज या दोघा ठाकरे बंधूनी सतरा वर्षाचे आपले वैर बासनात गुंडाळून भाजपला रोखण्यासाठी ते कुरुक्षेत्रात उतरले.पण,भाजप – ८९ व शिवसेना ( शिंदे गट ) – २८ यांनी अखेर बहुमताचा जादुई आकडा गाठला.मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना राज याना सोबत घेणे फारसे फायदेशीर ठरले नाही.मराठी भाषिक वगळता उत्तर भारतीय,गुजराती,मारवाडी व दाक्षिणात्य समाजाच्या मतदारांनी या दोघांकडे पाठ फिरवली.त्यामुळे शिवसेना ( उबाठा ) – ६५ व मनसे -०६,असे ७१ जागांवर त्यांना समाधान मानावे लागले.अन्य भाषिक समाजातील नागरिकांना मारहाण करणे,त्यांच्या मालमत्तेची नासधूस करणे व मुंबईत राहायचे असल्यास मराठीतच बोलावे लागेल,अशा प्रकारची सक्ती,त्यामुळे मराठी वगळता अन्य भाषिक
समाज या निवडणुकीत भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला.वरील उद्धव ठाकरे यांना सुमारे २१ जागांवर फटका बसला.तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला २४ जागा मिळाल्या.अशाप्रकारे महायुतीने मुंबईवरील उद्धव ठाकरे यांची मक्तेदारी मोडून काढली.आता या महानगराचे महापौरपद मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.त्यासाठी त्यांनी तिकडमबाजी सुरू केली आहे.आपले नगरसेवक भाजपच्या नादी लागतील,अशा भितीमुळे शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आणून ठेवले आहे.भाजप सत्तेच्या राजकारणात कोणत्याही थराला जाऊ शकतो,हे माहीत असल्यामुळे एकनाथ शिंदे सध्या चांगलेच सतर्क झाले आहेत.ठाण्यात मात्र शिंदे यांच्या शिवसेनेला १३१ जागांपैकी ७५ जागा मिळाल्या,त्यामुळे येथे महापौरपदी त्यांचा माणूस विराजमान होणार आहे.येथे भाजपला केवळ २८ जागा जिंकता आल्या.याच भाजपने पुणे व पिंपरी – चिंचवड या पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या महानगरपालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगल्याच मुसक्या बांधल्या.पुणे परिसरात ” तुम्ही नव्हे तर आम्हीच दादा आहोत,” हे दाखवून दिले.पुणे येथे एकूण १६५ जागांपैकी ११९ जागा जिंकत अजित पवार यांना चांगलाच धोबीपछाड दिला.येथे अजित पवार गटाला केवळ २७ जागा मिळाल्या.पिंपरी – चिंचवड येथे १२८ जागांपैकी ८४ जागा भाजपच्या पारड्यात गेल्या तर अजित पवार यांना ३७ जागांवर समाधान मानावे लागले.
राज्यातील एकंदरीत हे चित्र पाहता भाजपने इतर राजकीय पक्षाना नेस्तनाबूत करण्याचा छुपा अजेंडा राबवण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे.या निवडणुकीत देवाभाऊ व त्यांच्या टीमने आपल्या सोबत सत्तेत असलेल्या शिंदे व अजित पवार गटाला आता जेरीस आणले आहे.त्यामुळे अजित पवार यांची पावले पुन्हा आपल्या काकांच्या घराकडे वळू लागली आहेत.भविष्यात राज्यातील प्रत्येक पक्षासमोर आपले अस्तित्व टिकवण्याचे फार मोठे आव्हान उभे राहणार आहे आणि हे आव्हान पेलण्याची ताकद आजच्या घडीला तरी एकाही पक्षात नाही.

