दीपक मोहिते,
” अटीतटीचा सामना,”
वसई विरार मनपा निवडणूक ; क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारे निकाल…
वसई विरार शहरातील नागरिकांना आजवर निवडणुकीत चुरस काय असते,हे कधी बघायला मिळाले नव्हते. कारण,आजवर झालेल्या तमाम निवडणुका बहुजन विकास आघाडीने एकहाती जिंकल्या होत्या.काल प्रथमच त्यांना मिनिटा मिनिटाला उत्कंठा वाढवणाऱ्या निकालाचा अनुभव घ्यावा लागला.या निवडणुकीत भाजपने बहुजन विकास आघाडीसमोर प्रचंड आव्हान उभे केले होते.या निवडणुकीत भाजपला ८१ जागा मिळतील,अशी त्यांच्या स्थानिक नेत्यांना अपेक्षा होती.पण त्यांचा घोडा ४४ जागांवर अडखळला.शेवटच्या टप्यात बहुजन विकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली व ७१ जागांचा पल्ला गाठला.हा विजय केवळ आणि माजी आ.हितेंद्र ठाकूर यांची लढाऊ वृत्ती व प्रचंड मेहनत, अशा दोन कारणामुळे शक्य झाला.आज ठाकूर,हे आपला विजय हा कार्यकर्त्यांमुळे झाला,असे जरी सांगत असले तरी या विजयाचे खरे शिल्पकार ते स्वतः आहेत,असे त्यांच्यावर टीका करणारे विरोधकही म्हणू लागले आहेत.
सत्ता ताब्यात घेण्याइतके बहुमत मिळाले असले तरी या निवडणुकीत भाजपने पहिल्याच प्रयत्नात ४४ जागापर्यंत मजल मारली,याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.२०१५ साली झालेल्या महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा केवळ १ नगरसेवक निवडून आला होता.आज भाजपने जवळपास अर्धशतक गाठलं आहे.याकडे बहुजन विकास आघाडीचे नेते ठाकूर कसे बघतात,यावर पक्षाची भविष्यातील वाटचाल अवलंबून आहे.त्यांच्या दृष्टीने कार्यकर्ता सर्वस्व असला तरी पक्षात शिस्त,अनुशासन व लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणे,यावर भर देण्याची गरज आहे.या निवडणुकीत त्यांचे अनेक दिग्गज पराभूत झाले.त्यांना भाजपच्या नवोदित उमेदवाराकडून का पराभूत व्हावे लागले,त्यामागची नेमकी काय कारणे आहेत ? यावर ठाकूर यांनी आत्मचिंतन करायला हवे.ज्या पद्धतीने भाजपने अवघ्या सहा महिन्यात मुसंडी मारली आहे,ती त्यांच्यासाठी एकप्रकारे भविष्यातील धोक्याची घंटा आहे.हितेंद्र ठाकूर या निवडणुकीच्या प्रचारात स्वतः जातीने उतरल्यामुळेच भाजपचा घोडा ४४ अंकावर अडखळला.वसईची जनता त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते,हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.या विजयानंतर त्यांनी पक्षबांधणीकडे लक्ष द्यायला हवे.कारण,गेल्या काही वर्षात पक्ष मोठ्याप्रमाणात विस्कळीत झाला आहे.त्याला सावरणे हे फार मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.आजच्या घडीला पक्ष दोन गटात विभागला गेला आहे.नाराज गट अधिक नाराज होणे धोकादायक तर आहेच,पण या नाराज मंडळीना भाजप आपल्याकडे वळवण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे भाजपमध्येही सर्वकाही आलबेल आहे,अशी स्थिती नाही.येथील भाजप देखील दोन आमदाराच्या गटात विभागला गेला आहे.तर शिंदे गटाचे आमदार हे आपली वेगळी चूल मांडून संसाराची स्वप्ने रंगवत होते.त्यांना त्याचे परिणाम या निवडणुकीत भोगावे लागले.भाजपने त्यांना या निवडणुकीच्या जागावाटपात कस्पटासमान वागणूक दिली.त्यांना २४ जागा दिल्या खऱ्या, पण त्यापैकी ७ जागा,मागच्या दाराने पळवून नेल्या.भाजपला ” युतीचा धर्म,” या शब्दाची ऍलर्जी आहे.या निवडणुकीत भाजपला अनेक जागा आपापसातील मतभेदांमुळे गमवाव्या लागल्या.जुने व ज्येष्ठ पदाधिकारी,कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांना आठ ते दहा जागावर पाणी सोडावे लागले.त्यांनी जर यावर लक्ष दिले असते तर वेगळे चित्र पहायला मिळाले असते.पक्षात नवे – जुने असे जे वाद आहेत,ते मिटवण्यात आले नाहीत तर भविष्यात भाजपची वाढ खुंटू शकते.भाजपमध्ये गटबाजीला थारा मिळत नाही,त्यामुळे दोन्ही आमदारांनी समन्वयाने काम केल्यास भाजपला नक्कीच सुगीचे दिवस येऊ शकतील.

