दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आज माझे काय होणार ?
काल अखेर संध्याकाळी निवडणुकीची रणधुमाळी थांबली.मतदान संपल्यानंतर आज सकाळी दहाच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात होणार आहे.त्यामुळे सुमारे साडेपाचशे उमेदवारांचा जीव तब्बल १७ तास टांगणीला लागला आहे.आपलं काय होणार ? या एकमेव चिंतेने त्यांना घेरलं आहे.
काल सकाळच्या सुमारास रेंगाळलेल्या मतदानाने दुपारी दोननंतर चांगला वेग घेतला व संध्याकाळी मतदान संपले तेंव्हा ते ५७.१२ % झाले होते.मतदान करण्यासंदर्भात सर्वसाधारण मतदारामध्ये असलेली उदासीनता व आपण मतदान केले काय आणि न केल्याने काय फरक पडतो.अशा मानसिकतेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता अधोगतीच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.या निवडणुकीत भाजपने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता वसई विरार शहर महानगरपालिका जिंकण्यासाठी त्यांनी गेल्या पंधरा दिवसात विविध हातखंडे वापरले.त्यामुळे विरोधी पक्ष चांगलेच बॅकफूटवर गेले.पण या निवडणुकीत मतदारांनी नेमकी कोणाला साथ दिली,हे आज होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागली.सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, हे त्यामागचे नेमके कारण आहे.वास्तविक या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाणी,शिक्षण,आरोग्य,रस्ते,वाहतूक कोंडी व वैद्यकीय सेवा,इ.पायाभूत सुविधा मुद्द्यावर डिबेट होणे,आवश्यक होते.पण तसे घडले नाही,या प्रचारात दोन्ही बाजूकडून एकमेकांवर केवळ चिखलफेक व बदनामी करण्यात आली.वास्तविक मतदारांना हे अपेक्षित नव्हते, पण मतदारांना विचारतो कोण ? अशा सर्व परिस्थितीत ही निवडणूक पार पडली.काही किरकोळ वाद झाले,पण एरवी ही निवडणूक शांततेत पार पडली.आज या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.त्यामुळे रिंगण्यात उतरलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या जीवाची प्रचंड घालमेल सुरू आहे.त्यांना एकाच प्रश्नाने घेरले आहे,” आज माझे काय होणार ?”

