दीपक मोहिते,
” लोकशाहीचा दिखाऊ सोहोळा,”
कितीही डोळसपणे मतदान करा, पण तुमची किंमत शून्य…
आज महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे.सुमारे बारा लाख मतदार ११५ जागांसाठी मतदान करणार आहेत.मतदारांना देखील ठाऊक आहे,की केवळ आज आपल्याला किंमत आहे.उद्यापासून आपल्याला कुत्रंही विचारणार नाही.पण व्यवस्थेने ” मतदान हा अधिकार आहे,आणि ते आपण पार पाडलेच पाहिजे,” आपल्या मनात इतकं खोलवर रुजवले आहे की आपण हे कर्तव्य पार पाडण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडतो,व हे आद्य कर्तव्य पार पाडतो.
असो,पण तमाम मतदार आज सकाळीच या ऐतिहासिक सोहोळ्यात सामील होण्यासाठी घराबाहेर पडले आहेत.ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.वास्तविक या निवडणुकीच्या प्रचारात विकासाचा मुद्दा गाजेल, अशी अपेक्षा होती. पण आरोप – प्रत्यारोप,एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे,कोणी कुठे शेण खाल्ले,आमिष दाखवणे व फोडाफोडीचे राजकारण,याला अक्षरशः उत आल्याचे पाहायला मिळाले. वास्तविक मतदारांना हे अपेक्षित नव्हते, पण आपले लोकप्रतिनिधी मुळात कसे आहेत, ते दैनंदिन जीवनात कसे वागतात,हे पाहायला मिळाले. या सर्व प्रक्रियेकडे मतदार ” तीन पैश्याचा तमाशा,” या दृष्टीने आता पाहू लागले आहेत.त्यामुळे एकेकाळी ज्या प्रक्रियेला ” ” लोकशाहीचा उत्सव,” म्हणून ओळखण्यात येत असे, तो सोहोळा आता ” शत्रुत्वाचा विकृत सोहोळा,” म्हणून ओळखला जाऊ लागला. अशाही परिस्थितीत सर्वसाधारण मतदार मात्र आज ना उद्या बदल होईल,अशा आशेवर आपले कर्तव्य पार पाडत असतो. गेल्या काही वर्षात आपण निवडणुकीत मतदाराचे अमूल्य मत खरेदी करू शकतो,ही लोकशाही व्यवस्थेला मारक ठरणारी संकल्पना राजकीय पक्षात रुजल्यामुळे ” जिसके हाथमे लाठी,उसीकी भैस,” यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले.या सर्व जीवघेण्या खेळातील ” थर्ड अंपायर,” ( निवडणूक आयोग ) मात्र डोळ्यावर कातडे ओढून बसला आहे.तरीही प्रत्येक निवडणुकीत त्यांचे ” मतदान करणे,हा आपला हक्क आहे,तो,पार पाडलाच पाहिजे,” असे पालुपद सुरूच असते.आपण देखील त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत वेळात वेळ काढून मतदानासाठी घराबाहेर पडतो. आज देखील तुम्ही – आम्ही असेच घराबाहेर पडणार आहोत.पण आपल्या एका मताच्या बदल्यात आमच्या पदरात काय पडणार ? या प्रश्नाला आता काडीचीही किंमत उरलेली नाही.निवडणूक जिंकण्यासाठी मतदानाच्या अगोदरची रात्र सांभाळली की विजयस्तंभ सहज गाठता येतो,हा विश्वास दुणावत गेला आहे. ज्यांच्याकडे धन आहे,त्यांच्यासाठी ही रात्र “:सुहानी, ” ठरते,तर ज्यांच्याकडे तेवढे धन नाही,त्यांच्यासाठी ही ” काळरात्र, ” असते.या अशा परिस्थितीमुळे धनाढ्य उमेदवार आपल्या विजयाबाबत निश्चित असतात.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत तुम्ही कितीही डोळसपणे मतदान करा,पण,आपण निवडून दिलेले नगरसेवक किंवा नगरसेविका आपल्या मताशी प्रतारणा करणार नाहीत,अशा भ्रमात राहू नका.कारण ज्यांची मनेच मुर्दाड बनली आहेत. त्याच्याकडून अपेक्षा करणे, व्यर्थ आहे.

