दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
असंख्य गुन्हे असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,तब्बल १५६ उमेदवार कोट्याधीश,
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक जागांवर दिग्गज उमेदवारांच्या लढती होत आहेत.हे सर्व उमेदवार पूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरले आहेत.पण मतदार मात्र मनात काय चालले आहे,याचा थांगपत्ता काही लागू देत नाहीत.दरम्यान या दिग्गज उमेदवारांमध्ये हल्ले – प्रतिहल्याचा सिलसिला आता जोरात सुरू झाला आहे.या निवडणुकीत मतदार कोणाच्या पारड्यात आपली मते टाकतात,हे १६ जाने.रोजी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.प्रचार संपायला आता केवळ ७२ तास उरले आहेत.या तीन दिवसात उमेदवाराना वेगवान असा प्रचार करावा लागणार आहे.मतदानाच्या एक दिवस अगोदरच्या रात्री ” रात्रीचा खेळ चाले,” या नाट्याचा प्रयोग होण्याची शक्यता गृहीत धरून प्रत्येक राजकीय पक्ष सध्या दक्षता घेत आहेत.ही रात्र फार महत्वाची असते,त्यामुळे उमेदवार व त्यांचे सहकारी ही रात्र डोळ्यात तेल घालून जागता पाहरा देतात.
या निवडणुकीत माजी नगरसेविका व भाजपच्या उमेदवार माया चौधरी,महेश पाटील,नितीन ठाकूर,यशोधन ठाकूर,पंकज देशमुख,सुदेश चौधरी,बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील,प्रशांत राऊत,संगीता भेरे,पंकज ठाकूर,भरत मकवाना,निलेश देशमुख,माजी महापौर रुपेश जाधव,प्रविण शेट्टी,सेनेचे ( उबाठा ) उदय जाधव,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ओनील आल्मेडा,या उमेदवारांचा त्यामध्ये समावेश आहे.भाजप व बहुजन विकास आघाडीच्या अनेक उमेदवारांवर विविध पोलीस ठाण्यात असंख्य गुन्हे दाखल आहेत.या दाखलेबाज उमेदवारांना मतदार किती थारा देतात,यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.हल्ली राजकारणात चारित्र्यवान व सभ्य व्यक्तिमत्व असलेले चेहरे अपवादानेच आढळतात.जोवर तुम्हाला न्यायालय दोषी ठरवत नाही,तोवर तुम्ही गुन्हेगार नाहीत,असे मानले जाते.त्यामुळे असे असंख्य उमेदवार आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळतात.या निवडणुकीत उतरलेल्या ५४७ उमेदवारांपैकी १५६ उमेदवार कोट्याधीश असल्याचे त्यांनी आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.निवडणूक आयोगाने या कोट्याधीश उमेदवारांचे आर्थिक स्रोत शोधायला हवेत.वास्तविक ज्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत,त्यांची उमेदवारी रद्दबातल ठरवणे,आवश्यक आहे.पण कायद्यातील पळवाटा शोधून हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात.

