दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” उखडून फेकून द्या,” ; भूतकाळात जरा डोकावून बघा
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्यात आता शह-काटशह,एकमेकांवर चिखलफेक,करणे,बॅनर्स फाडणे,असे प्रकार सुरू झाले आहेत.अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नालासोपारा येथे झालेल्या जाहीर सभेत ” येथील सत्ताधाऱ्यांना उखडून फेकून द्या,” अशी खालच्या पातळीवर उतरून टीका केली.हा प्रकार आगीत तेल ओतण्यासारखाच आहे.वास्तविक कार्यकर्त्याना चथावणी देणाऱ्या भाषेचा वापर करता कामा नये होता.पण,त्यांनी ती तशी केली.विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधकांना घेरणे,हे साहजिक होते,पण अशा प्रकारची भाषा वापरणे मात्र योग्य नव्हते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात आपण या भागात केलेल्या विकासकामांची जंत्रीच वाचून दाखवली.गेली पंधरा वर्षे तुमचा खासदार,पालकमंत्री देखील तुमचा,या तालुक्यात दोन आमदार वगळता इतर आमदार तुमचे,मग हा उपप्रदेश विकासाच्या बाबतीत मागासलेला का ? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी खरंतर द्यायला हवं होतं.आपल्या भाषणात त्यांनी सुर्या पाणीपुरवठा योजनेचे श्रेय देखील स्वतःकडे घेतले.हा प्रकल्प १९९८ साली मार्गी लागला.त्यानंतर या प्रकल्पाचा दुसऱ्या टप्याला कोणाच्या काळात हिरवा कंदील दाखवण्यात आला.याविषयी त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते.मुख्यमंत्री प्रत्येक सभेत विकासकामे आम्ही केली,लोकांना पायाभूत सोयी – सुविधा आम्ही उपलब्ध केल्या,अशी टिमकी वाजवत असतात.पण या उपप्रदेशातील जीवघेणे रस्ते,अपुरा पाणीपुरवठा,महानगरपालिकेत गेल्या पांच वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत भ्रष्ट कारभार कोणी केला.या महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले भ्रष्ट अधिकारी हे कोणत्या मंत्र्यांचे फंटर्स आहेत व होते,हेही वसईकर जनतेला त्यांनी सांगायला हवे होते.” आम्ही यंव केले,आम्ही तंव केले,” तसेच भविष्यात कोणत्या योजना आणणार आहोत,हे सांगण्याऐवजी त्यांनी भूतकाळात जे काही झाले,त्याला आमचे सरकारही तेवढेच जबाबदार आहेत,हे कबुल करायला हवे होते.येथील सत्ताधारी जर नालायक होते,तर सरकार स्थापन करताना त्यांचा तुम्ही पाठिंबा का घेतला ? तुम्ही व तुमच्या मंत्रिमंडळाचे अनेक मंत्री हितेंद्र ठाकूर यांच्या गळ्यात गळा का घालत होते.त्यांच्या तीन आमदारांना सहयोगी सदस्य करून घेताना आपल्याला त्यांच्या भूतकाळाचा सोयीस्करपणे विसर पडला का ? आता मात्र तुम्ही ” त्यांना उखडून फेकून द्या,” ची भाषा करता, हे केवळ वसईकर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे.

