दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
खरी लढत भाजप व बहुजन विकास आघाडीमध्येच…
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने “आम्हाला देण्यात आलेल्या सात जागांवर आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे युतीचा धर्म भाजपने पाळला नाही,असा आरोप शिंदे गटाचे आ.विलास तरे यांनी वसई येथे केला.त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिंदे गटाने असा आरोप करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनेही ( अजित पवार ) असाच आरोप केला होता.या सर्व घडामोडीमुळे वसई विरार मनपा निवडणुकीत महायुती मोडीत निघाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.भाजपने या महानगरपालिकेत ८५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.त्यासाठी आपल्या सोबत असलेल्या घटक पक्षांना त्यांनी योग्य प्रमाणात जागा दिल्या नाही.जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार ) तोंडाला तर त्यांनी पाने पुसली.त्यानंतर त्यांनी शिंदे गटाच्या सात जागांवर आपले उमेदवार उभे केले व त्यांना एबी फॉर्मही दिले.त्यामुळे त्यांचे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर व आ.विलास तरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.या दोन्ही पक्षाचा प्रचार एकत्रितपणे होत असला तरी त्यांच्यात कटुता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.तसेच भाजपने या निवडणुकीत माजी नगरसेवक किरण भोईर,ज्येष्ठ पदाधिकारी मनोज बारोट यांच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्त्याना उमेदवारी नाकारली.त्यामुळे अनेक जणांनी बंडखोरी केली आहे.पण त्यांच्या बंडखोरीचा पक्षावर फारसा परिणाम होणार नाही,असे पक्षातर्फे सांगण्यात येत आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,मनसे व बहुजन विकास आघाडी या तिन्ही
पक्षांनी या निवडणुकीत एकत्रितपणे मोट बांधली असली तरी भाजपला रोखण्यासाठी केवळ बहुजन विकास आघाडी एकहाती खिंड लढवत असल्याचे पाहायला मिळत आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मनसेचा प्रचारात कुठेही प्रभाव पाहायला मिळत नाही.त्यामुळे येथे खरी लढत भाजप व बहुजन विकास आघाडीमध्येच होत आहे.

