दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
ताकद नसताना पाठिंबा देण्याचे नाट्य…
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) या दोघांनी अनुक्रमे बहुजन विकास आघाडी व भाजपच्या बंडखोर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.त्यांच्या या कृतीकडे वसई- विरारकर मतदार एक ” अफलातून विनोद,” दृष्टीने पाहत आहेत.वसई तालुक्यात या दोन्ही पक्षाची ताकद असून नसल्यासारखी आहे,या दोन्ही पक्षाना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणे आजवर कधीच शक्य झाले नाही.अशीच परिस्थिती संपूर्ण पालघर जिल्ह्यात देखील पाहायला मिळते.
अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षानी काल पक्षाने बहुजन विकास आघाडी व भाजपच्या बंडखोर उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले.त्यामुळे येथील मतदार देखील अचंबित झाले.जागावाटपा दरम्यान भाजप – शिवसेना ( शिंदे गट ) या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार ) या भागात बिलकुल ताकद नसल्याचे कारण पुढे करत खड्यासारखे बाजूला काढले होते.आज तो पक्ष भाजपच्या बंडखोराला पाठिंबा दिल्याचे पत्रक प्रसिद्धीस देतो,या घडामोडीकडे येथील मतदार या वर्षाचा ” सर्वोत्कृष्ट विनोद,” या दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत.भाजपचे बंडखोर व बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनाही माहीत आहे की यांच्या पाठिंब्याने आपल्या उमेदवारांचे काही भले होणार नाही.पण निवडणुकीच्या काळात कोणालाही दुखवायचे नाही,असे धोरण असल्यामुळे त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत.राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) जव्हार व विक्रमगड तालुका वगळता इतर पाच विधानसभा मतदारसंघात नाममात्र अस्तित्व आहे.अडीच वर्षांपूर्वी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अक्षरशः वाताहत झाली.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड येथून त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा निवडून आले होते.पण २०२४ मध्ये त्यांना आपली जागा टिकवता आली नाही.भाजपचे हरिश्चंद्र भोये यांनी एकतर्फी झालेल्या लढतीत त्यांचा दारुण पराभव केला.पक्षफुटीनंतर त्यांच्यावर पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली,पण त्यांनी पक्षबांधणीकडे कधीच लक्ष दिले नाही.तशीच परिस्थिती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.वसई – विरार जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यात त्यांचा बिलकुल मागमूस नाही.अशा सर्व परिस्थितीत त्यांनी पाठिंब्याची पत्रके प्रसिद्धीस देणे,म्हणजे एक उत्कृष्ठ विनोदच म्हणावे लागेल.

