दीपक मोहिते,
सत्तेत कोणीही या,पण आम्ही दिलेल्या मताशी प्रतारणा करू नका,भ्रष्ट व अनागोंदी कारभार रोखा,
निवडणुकीचे सारे सोपस्कार आता जवळपास संपल्यात जमा आहेत. उमेदवार व मतदारांना मतदान व मतमोजणी होणाऱ्या दोन दिवसाची प्रतिक्षा आहे.गेल्या तीन दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच पक्षाची उमेदवारी न मिळालेले नाराज उमेदवार आता प्रचाराला लागले आहेत.प्रचार सुरू झाला असला तरी राजकीय पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते हे रिंगणात उतरलेल्या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी सक्रिय झाले आहेत.त्यांना या कामात किती यश येते हे,येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.

मतविभागणी टाळण्यासाठी हे सारे काही करावे लागत असते.ही प्रक्रिया गेली अनेक वर्षे पाहायला मिळत आहे.” आम्हाला उमेदवारी का नाही ? आयुष्यभर पक्षासाठी आम्ही मर मर मेलो आणि मागून आलेल्यासाठी रेड कार्पेट.आम्ही मात्र केवळ सतरंज्या उचलण्यासाठीच आहोत का ? असे दोन प्रश्न निवडणुकीच्या काळात सतत कानावर पडत असतात.पूर्वी ही सारी खदखद छुप्या स्वरूपात असायची,पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ती थेट मतदारपर्यंत पोहोचू लागली आहे,त्यामुळे ” बंडोबाना थंडोबा,” करण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्याना आपली शक्ती खर्ची घालावी लागत आहे.या प्रयत्नात नेत्यांना माफक प्रमाणात यश देखील मिळते.पण निकालामध्ये मात्र मतदार या बंडखोर उमेदवारांचा ” पोपट,” करत असतात.त्यामुळे अपक्ष उमेदवारांचे रिंगणात असणे,हे चहाच्या पेल्यातील वादळ ठरत असते.
अशा या घनघोर युद्धात मतदार मात्र ” सत्तेत कोणीही या,पण आम्हाला आमच्या कराच्या बदल्यात चांगल्या नागरी सुविधा द्या.आमच्या महानगरपालिकेतील अनागोंदी व भ्रष्टाचार रोखा,असे साकडे घालत असतात.याही निवडणुकीत त्यांचे हेच म्हणणे आहे.काळाच्या ओघात सारे काही बदलत असते,पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात मात्र कोणताही बदल होत नाही.वर्षानुवर्षे हे असंच चालत आलं आहे.मतदारांनी लोकशाही जपणे व पारदर्शक कारभार,यासाठी नागरिकांनी आपल्या मताच्या अधिकाराचा वापर करावा,यासाठी निवडणूक आयोग सतत जनजागृती करत असतो.पण परिणाम शून्य…
वसई विरार शहर महानगरपालिकेची ही तिसरी सार्वत्रिक निवडणूक असून ती तब्बल १० वर्षानंतर होत आहे.गेल्या पंधरा वर्षात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट व अनागोंदी कारभारामुळे मनपा हद्दीतील चार शहरे व अन्य परिसर कात टाकू शकली नाही.पाणी,आरोग्य,
वैद्यकीय सेवा,पर्यावरण,वाहतूक व अन्य नागरी सुविधांपासून करदाते आजही उपेक्षित जीवन जगत आहेत.” सत्तेत कोणीही या,पण आम्हाला माणूस म्हणून जगू द्या,” गेली पंधरा वर्षे या उपप्रदेशाचे लचके तोडणारे प्रशासनातील शुक्राचार्यांचा गलथान कारभार रोखा,असा आक्रोश करदाते करत आहेत.चला बघूया,या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी मतदारांच्या या मतांना किती किंमत देतात ते…!

