दीपक मोहिते,
कुरुक्षेत्र,
वसई विरार मनपा निवडणूक ; काँग्रेस व मनसेने आपल्या निवडणूक चिन्हाना श्रद्धांजली वाहण्याची गरज नव्हती…
निवडणुकीचे सारे सोपस्कार आता जवळपास पूर्ण झाले असून उद्यापासून प्रचाराचे ढोल ताशे वाजू लागणार आहेत.भाजप – शिंदे गट या दोघांची अभेद्य युती विरोधात विरोधकांची विस्कळीत आघाडी,अशी सरळ लढत होत आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) घड्याळ मात्र सुरूच झाले नाही.त्यांची टिकटिक वसईच्या मतदारांच्या कानावर पडण्या अगोदरच भाजपने ते बंद पाडले.

या निवडणुकीत शिंदे गटाने समंजसपणा दाखवला नसता तर त्यांचाही राष्ट्रवादी झाला असता.पण एकनाथ शिंदे यांचे वास्तवाचे भान ठेवून वागण्याचे कसब नक्कीच कौतुकास्पद असेच आहे. त्यामुळे या निवडणुकीत या दोघांनी महायुतीच्या तीन सरकारमधील आपापली इंजिने व्यवस्थितपणे उतरवली.
दुसरीकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जागे झालेल्या विरोधी पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शहाणपण सुचले नाही.जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कशी बिघाडी झाली,ते सर्वांना पाहायला मिळाले.शिवसेनेने ( उबाठा ) आपल्याला अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे त्यांनी आपली वेगळी चूल मांडली.आता त्यांच्या चुलीवरचे जेवण स्वादिष्ट बनते की बेचव,हे १६ जाने.निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.दुसरीकडे भाजप व शिवसेनेने ( शिंदे गट ) यांनी मात्र आपले रुसवे फुगवे बाजूला ठेवत आपली दोन इंजिनची महायुती प्रत्यक्षात आकारास आणली.विरोधकांना मात्र या निवडणुकीत मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता आहे.राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे.
२०१५ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने या महानगरपालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.त्यावेळी बहुजन विकास आघाडी – १०६,शिवसेना ( एकसंघ ) – ०५,भाजप – ०१,अपक्ष -०३ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ००,असे बलाबल निर्माण निर्माण झाले होते.त्यामुळे आघाडी करण्यासंदर्भात बोलणी करताना त्यांनी याचा आधार घेत मित्रपक्षांना अधिक जागा देण्यास नकार दिला.त्यामुळे शिवसेनेने (उबाठा ) ” एकला चलो रे,” ची भूमिका घेतली.वास्तविक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपली झालेली प्रचंड पीछेहाट लक्षात घेऊन बहुजन विकास आघाडीने दोन पावले मागे जाण्याची तयारी दाखवायला हवी होती.पण राजकीय महत्वाकांक्षेपुढे वास्तवाकडे दुर्लक्ष होत असते,नेमके तेच या निवडणुकीच्या बोलणीमध्ये त्यांच्याकडून झाले.आघाडीतील बिघाडी ही भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर पडणारी आहे.त्यामुळे विरोधी पक्षांचे वागणे हे ” हुं तो मरिस,पण तने,” बनावाने मरिस,” असेच आहे.
शिंदे गटानेही जागावाटपा संदर्भात भाजपसमोर अक्षरश लोटांगण घातले.भाजपशी पंगा घेणे,आपल्याला शक्य नाही,हे लक्षात घेऊन जे काही पदरात पडते,ते गोड मानून घ्या,असे सूत्र त्यांनी अवलंबले.” माघारीमध्ये शहाणपण आहे,” युद्धातील या नितीनुसार शिंदे गट वागला.तसा तो वागला नसता तर त्यांचा नक्कीच राष्ट्रवादी झाला असता.
वास्तविक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वतःच्या निवडणूक चिन्हाला श्रद्धांजली वाहण्याची गरज नव्हती, कारण,या चिन्हाच्या मागे एक इतिहास आहे.पण शिट्टी या चिन्हासमोर ” हाताचा पंजा,” हे चिन्ह कमकुवत ठरेल,अशा भितीतून त्यांनी आता शिट्टी वाजवायला घेतली आहे. मनसेचे इंजिनही चालणार नाही,हे उमगल्यानंतर त्यांनीही शिट्टी आपल्या तोंडाला लावली आहे.पण या ऐतिहासिक बदलामुळे काही फरक पडेल,असे वाटत नाही.

