दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
निवडणुकीचे तिकीट,आता एटीम कार्ड बनले आहे…
दोन दिवसांपूर्वी मांडवातील गोंधळ संपला आहे.गेले सात दिवस प्रतिक्षेत असलेल्या नवरा व नवरी मुलींचा संसार आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.कुटुंबातील कर्त्या धर्त्यांनी एकमेकांना पाहण्याच्या कार्यक्रमात नवरा -नवरीला प्रचंड मनस्ताप दिला,त्यामुळे थकले भागलेले हे दोघे आता संसाराची जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतले आहेत.त्यांचा हा संसार १६ जाने.नंतर रुळावर येणार आहे.पण येणारा १५ दिवसाचा हा काळ,त्यांच्यासाठी अत्यंत खडतर असाच आहे.१५ जाने.रोजी होणाऱ्या अग्निदिव्यातून गेल्यानंतर मात्र त्यांना सलग पाच वर्षे रिसेप्शन साजरा करायला मिळणार आहे.या काळात त्यांना केवळ आहेराची पाकिटे घेत राहायचे आहे.त्यामुळे सध्याचा त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे.हा त्रास केवळ एक महिन्यापूरता असून उर्वरीत चार वर्षे अकरा महिने केवळ आहेर घेतच राहायचे आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सार्वजनिक निवडणुकीचे काम जवळपास ७० % पूर्ण होत आहे.३ जाने.पासून उमेदवार मतदारांना गाठण्यास सुरुवात करणार आहेत.त्यांना अवघ्या तेरा दिवसात दररोज सरासरी एक हजार ते दीड हजार मतदारांना गाठावे लागणार आहे.इतक्या कमी कालावधीत मतदारांना भेटणे त्यांना शक्य नाही.त्यामुळे प्रत्येक उमेदवार,पदयात्रा व चौक सभा यावर भर देणार आहेत.या दोन पर्यायाशिवाय अन्य पर्याय नाही.कारण,प्रत्येक प्रभागात सरासरी ३५ हजार मतदार आहेत.त्यामुळे हे दोन पर्याय स्विकारणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरते.आपण परिसर विकासासाठी काय केले व निवडून आल्यानंतर काय करणार आहोत.अशा दोन स्तरावर त्यांना प्रचार करावा लागणार आहे.मतदारही या दोन ज्वलंत प्रश्नी उमेदवाराला हल्लीच्या काळात सहसा प्रश्न विचारत नाहीत.त्यामागे अदृश्य असे एक कारण असते.त्यामुळे हल्ली उमेदवार देखील आपल्याला अडचणीत आणणारे प्रश्न मतदार विचारणार नाहीत,अशा विश्वासाने वावरत असतात.उमेदवारांनी आपला प्रचार किती जोमाने व प्रभावीपणे केला याला महत्व नसते,मतदानाच्या अगोदरच्या रात्री जो आपला पेटारा खोलतो,त्यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते.या प्रक्रियेमध्ये जो सरस ठरतो,तोच ” सिकंदर,” असतो.अलीकडच्या काळात या पेटाऱ्याला अनन्यसाधारण महत्व आले आहे.मतदार देखील आता ” तुम्ही बिघडलात,आम्हीही थोडे बिघडतो,” अशा भूमिकेत आले आहेत.कारण,स्वातंत्र्योत्तर काळात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे.निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी जे रणकंदन व हाणामाऱ्या पाहायला मिळतात,त्यामुळे हे तिकीट आता एटीम कार्ड बनले आहे.हे एटीम कार्ड मिळाले की आपली आयष्यभराची ददात संपली,हा विचार आपल्या समाजात चांगलाच रुळला आहे.मात्र,मतदारांचे बिघडणे,हे आपल्या व्यवस्थेला मारक ठरणारे आहे.पण येथे ऐकतो कोण ? कारण,” मी,माझा स्वार्थ व केवळ माझे कुटुंब,” ही आधुनिक काळातील संकल्पना आता चांगलीच आकाराला आली आहे.

