दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” राजकारणात कधीही काहीही होऊ शकते,”
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ११५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज ३.०० वाजता थांबणार आहे.आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी महानगरपालिका परिसराला छावणीचे स्वरूप येणार आहे.मित्रपक्षाशी बोलणी व बंडखोरीची भिती,अशा दोन कारणामुळे उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात प्रत्येक राजकीय पक्षाने विलंब लावला.त्यामुळे आज उमेदवारांची चांगलीच धावपळ होणार आहे.तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक होणार आहे.
अशी परिस्थिती असतानाही काही उमेदवारांची नांवे जाहीर झाली आहेत.पण,ज्यांना उमेदवारी मिळाली नाही,त्यांनी आता आपली वाघनखे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.तर काही राजकीय पक्ष प्रतिस्पर्धी पक्षातील नाराजांच्या नाराजीला प्राणवायू देत आहेत.निवडणुकीच्या राजकारणात अशाप्रकारचे फंडे हे अपेक्षितच असतात.या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाकडे इच्छुकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.जागावाटपात भाजपने बाजी मारली आहे. ( भाजप – ९१ व शिंदे गट – २४,) त्यांच्या या निर्णयामुळे दोन्ही पक्षात असंतोषाचा भडका उडाला आहे.हे होणे तसे साहजिकच आहे,कारण,या दोघांचे नाणे सध्या चलनी नाणे आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा गगनाला पोहोचल्या आहेत.अशा परिस्थितीमध्ये जर उमेदवारी नाही मिळाली तर अस्वस्थता निर्माण होणारच. ” आपल्याला मिळायलाच हवे,” हा मानवी स्वभाव आहे,आणि तो निसर्गाने आपल्याला बहाल केला आहे.त्यामुळे भाजप व शिंदे गटासमोर बंडखोरांची समजूत काढण्याचे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे.आजवर या दोन्ही पक्षाची वाटचाल लक्षात घेता,ते ही बंडखोरी मोडून काढण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाहीत.शिंदे गटाशी जागावाटपाचा समझौता करताना भाजपने शिंदे गटाला चांगलेच खिंडीत पकडल्याचे पाहायला मिळाले.नालासोपारा विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधिक्य लक्षात घेता भाजपने या शहरात शिंदे गटाला डोके वर काढू दिले नाही.तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरी ठेवण्यात चांगले यश मिळवले.शिंदे गटाने हा मार चुपचाप सहन केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यानी तोंडातून ब्र देखील काढला नाही.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वसई तालुक्यात आपली ताकद नसल्याचे ठाऊक असल्यामुळे त्यांनी या प्रकरणी कसलेही आढेवेढे घेतले नाहीत.अशाप्रकारे भाजपने अचूक संधी साधली.भाजपच्या एक महिला कार्यकर्तीने आपल्याला उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ खूप थयथयाट केला,पण त्याची दखल एकाही वरिष्ठ नेत्याने घेतली नाही.त्यामुळे हे बंड फार काळ टिकेल,असे वाटत नाही.भाजपमध्ये बंड करणाऱ्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवला जातो.त्यामुळे सहसा कोणी बंड करण्याच्या भानगडीत पडत नाही.
दुसरीकडे बहुजन विकास आघाडीकडेही इच्छुकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे.या पक्षाला बंडखोरीची लागण आजवर कधीही लागली नाही,व ती यंदाही लागणार नाही.या पक्षाचे सर्वेसर्वा माजी आ. हितेंद्र ठाकूर हे या निवडणुकीत सक्रिय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मनसे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा त्यांचा निर्णय किती फायदेशीर ठरतो,हे सांगणे जरा कठीण आहे.कारण,या दोन्ही पक्षाची ताकद वसई व नालासोपारा विधानसभा मतदारसंघात अगदी नगण्य आहे.त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना ही खिंड स्वतःलाच एकहाती लढवायला लागणार आहे.कारण,भाजपच्या आव्हानाला तोंड देण्याची क्षमता फक्त हितेंद्र ठाकूर यांच्याकडेच आहे.ज्या काँग्रेसच्या विजय पाटील यांच्यासोबत त्यांचा कलगीतुरा रंगला होता,जेसीबीच्या कडवट भाषेने वसईकर हबकून गेले होते,ते दोघे आज मांडीला मांडी लावून बसलेले वसईकर जनतेला पाहायला मिळतात,यावरून ” राजकारणात कधीही काही होऊ शकते,” यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

