दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
वसई विरार मनपा निवडणूक ; पराकोटीचा संघर्ष व हाणामाऱ्या पाहायला मिळणार…
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्राच्या चार शहरात राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.एकमेकांवर होत असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे.त्यासाठी सोशल मीडियाचा बेसुमार वापर सुरू झाला आहे.प्रचाराची दिशा पाहता,या निवडणुकीत प्रचाराचा भर हा ” सकारात्मक दृष्टिकोना,” वर आधारित नसणार,हे स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत युट्युब चॅनलला सुगीचे येणार,हे स्पष्ट होत आहे.” स्वस्त व मस्त,” अशा चौकटीत होणाऱ्या त्यांच्या प्रचाराला उमेदवारांची पहिली पसंती मिळू लागली आहे.त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी या युट्युबर्सना जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे.फेसबुक,व्हाट्सअप व इंस्टाग्रामवर उमेदवारांच्या मुलाखतीचा जो सिलसिला सुरू झाला आहे,तो त्याचाच एक भाग आहे.
नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास आता केवळ ४८ तास उरले आहेत.गेल्या सहा दिवसात या कामाला बिलकुल वेग आला नाही.मात्र या दोन दिवसात उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता आहे.प्रत्येक निवडणुकीत ही प्रक्रिया अखेरच्या दोन दिवसात वेग पकडत असते.यंदाही तशीच स्थिती पाहायला मिळत आहे.दरम्यान ज्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे,त्यांनी गेल्या चार ते पाच दिवसापासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.यंदाची ही निवडणूक सत्ताधारी व विरोधक हे आपल्या अस्तित्वाची ही लढाई आहे,असे गृहीत धरून या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.त्यामुळे निवडणूक व पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येणार आहे.त्यादृष्टीने त्यांनीही तयारी चालवली आहे. भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) व बहुजन विकास आघाडी या तीन पक्षांनी कोणत्या प्रभागात कोण निवडून येऊ शकतो.याचा आढावा घेऊन उमेदवार निवड प्रक्रिया राबवण्यावर भर दिला.हमखास निवडून येणे,मनुष्य/आर्थिक बळ व आश्वासक चेहरा,अशा चार निकषावर उमेदवारांच्या निवडी केल्या आहेत.त्यामुळे या निवडणुकीत तुंबळ संघर्ष पाहायला मिळणार आहे.या महानगरपालिकेच्या २०१० व २०१५ अशा दोन सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.या दोन्ही निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.या दोन्ही निवडणुका या पक्षाने आरामात खिश्यात घातल्या होत्या.पण यंदाची ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही.भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोघांनी त्यांच्यासमोर फार मोठे आव्हान उभे केले आहे.२०१५ पर्यंत वसई विरार उपप्रदेशात त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता.त्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर ( २०२४ ची विधानसभा निवडणुक ) भाजपने बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी कंबर कसली आहे.विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजपचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे.उपप्रदेशात मतदारांना त्यांच्या रूपाने एक पर्याय मिळाला.लोकांचा मिळालेला प्रतिसाद व बहुजन विकास आघाडीतील असंतुष्ट आत्म्याच्या गोतावळ्यावर भाजपने त्यांना आता घेरण्यास सुरुवात केली आहे.उपप्रदेशातील राजकीय परिस्थिती व सोशल मीडियावर सुरू असलेला संघर्ष लक्षात घेता ही निवडणूक केवळ औपचारिक प्रक्रिया न राहता एक घनघोर लढाई,अशी होण्याची शक्यता आहे.

