दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
बविआ,मनसे व काँग्रेस आघाडी ; भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर पाडणारी…
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोन प्रमुख पक्षांनी जागावाटपाच्या प्रक्रियेत बाजी मारली आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील शिवसेना ( उबाठा ) ही निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे.पण उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांच्या मनसेने मात्र बहुजन विकास आघाडीच्या निवडणूक चिन्हावर ही निवडणूक लढवण्याचे मान्य केल्याचे समजते,पण त्याबाबतची अधिकृत घोषणा मनसेकडून अद्याप झालेली नाही.त्यामुळे बविआ व मनसे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.बविआ व मनसे या दोन पक्षात होणारी युती भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर पडणारी आहे.

बविआने मनसेला सोबत घेतल्यामुळे उत्तर भारतीय,गुजराती,मारवाडी,जैन व सामवेदी या समाजाची एकगठ्ठा मते भाजप व शिंदे गटाकडे वळण्याची दाट शक्यता आहे.बविआ व मनसे सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आली तर त्यांनाही या निवडणुकीत जबर फटका बसू शकतो.ख्रिस्ती समाजाची मते काँग्रेसला मिळतील.पण मुस्लिम समाजाच्या मतावर मात्र एआयएमआयएम हा मुस्लिमधार्जिणा दक्षिणेतील पक्ष डल्ला मारण्याची दाट शक्यता आहे.सध्याची ही राजकीय स्थिती लक्षात घेता बविआ,मनसे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या आगळ्या वेगळ्या आघाडीला फायदा होईल,असे वाटत नाही.उलट या विचित्र आघाडीमुळे बहुजन विकास आघाडीचा पारंपारिक मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता अधिक आहे.

जमिनीच्या अनेक गैरव्यवहार प्रकरणी आगरी समाज हा बहुजन विकास आघाडीपासून दूर गेला आहे.आगरी सेनेचे कैलाश पाटील यांनी या प्रश्नी गेल्या पाच वर्षात बहुजन विकास आघाडीच्या विरोधात अक्षरशः रान उठवले आहे. तर समुद्रकिनारी असलेल्या गावात राहणारा सामवेदी व ख्रिस्ती समाज हा बहुजन विकास आघाडीला कधीही मतदान करत नाहीत.या दोन्ही समाजातील मूठभर तरुण उद्योजक ( बिल्डर्स ) बहुजन विकास आघाडी सोबत असले तरी त्यांना समाजात फारसे कोणी विचारत नाहीत.अशी ही राजकीय परिस्थिती बविआ,मनसे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आघाडीला कितपत फायदेशीर ठरेल,हे सांगणे आजच्या घडीला कठीण आहे.

