दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
वसई विरार शहर मनपा निवडणूक ; भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला ( अ.प.गट ) घराबाहेर काढले,
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या महायुतीमधील प्रमुख घटक पक्षांनी अखेर जागावाटपाचा तिढा यशस्वीपणे सोडवला आहे.जागावाटपाचा समझोता करताना त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीवपूर्वक महायुतीच्या घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवले.या दोघांनी केलेल्या समझौत्यामध्ये भाजपने ९१ तर शिंदे गटाला २४ जागा असे ठरवले.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा तीळपापड झाला आहे.भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा दिली नाही.वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यानी युतीतील हे दोन दिग्गज पक्ष आपल्यासाठी जागा सोडतील,अशी अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे होते.कारण,राष्ट्रवादी काँग्रेसची ( अजित पवार गट ) शहरी भागात ( मुंबई,पालघर व ठाणे ) ताकद नगण्य आहे.त्यामुळे त्यांनी वसई विरार उपप्रदेशात आपल्याला ४० ते ५० जागा मिळतील,अशी अपेक्षा ठेवणे मुळात चुकीचे होते.आपली ताकद किती ? आणि आपण किती जागा मागतो,याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सारासार विचार करायला हवा होता.पण,तसा त्यांनी तो केला नाही, त्यामुळे त्यांना तोंडघशी पडावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी भाजपच्या नावाने आता गळे काढत आहेत.गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला या उपप्रदेशात एकही जागा लढवता आली नाही.पालघर जिल्हा व शहरी भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नसल्यामुळे तसेच त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे कामकाज हाताळताना माजी आ.ठाकूर यांची सतत मदत घेत असतात.त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या पक्षाला भाजप व शिंदे गटाने महायुतीमध्ये खड्यासारखे बाजूला ठेवले.स्थानिक नेत्यानी पक्ष वाढवण्यासाठी आजवर कोणतेच प्रयत्न केले नाहीत.भाजपने या पक्षाची जिल्ह्यात फारसे भवितव्य नसल्याचे पाहून या निवडणुकीत त्यांची वल्कले काढून घेतली.राष्ट्रवादी काँग्रेसची ( शरद पवार गट ) परिस्थितीही आजच्या घडीला अशीच आहे.या दोन्ही पक्षाचे मूठभर पदाधिकारी केवळ पक्षाचे लेबल लावून फिरण्यात धन्यता मानत आले.त्यामुळे या दोन्ही पक्षांना जिल्ह्यात फारसे कोणी विचारत नाही.पक्षाच्या उभारणीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतःला झोकून दिले असते तर महायुतीमध्ये अजित पवार गटाला एक ते दोन जागा भाजपने दिल्या असत्या,पण,स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या महत्वाच्या कामाकडे कायम दुर्लक्ष केले.शिंदे गटाची इतर पक्षाच्या तुलनेत जिल्ह्यात व शहरी भागात बऱ्यापैकी ताकद असूनही भाजपने त्यांची केवळ २४ जागांवर बोळवण केली तर राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार गट ) बोहोल्यावर चढूच दिले नाही,त्यामुळे मुंडावळ्या बांधण्याचा प्रसंगच उद्भवला नाही.भाजपने त्यांना डावलताना हातचे राखून ठेवले नाही,त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना ” तुमची वसई – विरार शहरात बिलकुल ताकद नसल्याचे स्पष्ट केले.पावसाळ्यात जसे बेडूक बाहेर,येतात तसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आजवरचे वागणे होते.त्यानुसार त्यांनी यांचा निवडणुकीत महायुतीला कोणताही फायदा होणार नाही,जाणले व त्यांना घराबाहेर ठेवले.या अनुभवातुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानी योग्य तो बोध घ्यायला हवा.जोवर पक्षाच्या उभारणीचे महत्व त्यांना कळत नाही,तोवर भविष्यातही त्यांना महायुतीमध्ये अशीच वागणूक मिळत राहणार.

