दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
निवडणुकीच्या तोंडावर भाजप,बहुजन विकास आघाडीला घेरण्याच्या तयारीत…
विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.उमेदवार निवडीची त्यांची प्रक्रिया अंतिम टप्यात पोहोचली असून येत्या दोन दिवसात त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल,असा अंदाज व्यक्त होत आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी भाजप व शिंदे गट विविध हातखंडे वापरू लागले आहे.२०१५ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने १०६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.त्यावेळी शिवसेना – ०५,भाजप – ०१,अपक्ष -०३ असे बलाबल निर्माण झाले होते.त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने दैदिप्यमान असा विजय मिळवल्यानंतर भाजपने या महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी रणनिती आखली आहे.त्यांनी गेल्या महिनाभरात बहुजन विकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्याना आपल्या जाळ्यात ओढले.त्यामुळे बहुजन विकास आघाडी सध्या खिळखिळी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान विवांता हॉटेलमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या चारशे ते साडेचारशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.त्या गुन्ह्यातील आरोपींना निवडणुकीच्या काळात तडीपार करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी आता हालचाली सुरू केल्या आहेत.त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे.या प्रकरणी येत्या १७ जाने.रोजी सुनावणी होणार आहे.त्यामुळे पोलिसांना ही कारवाई करता येणार नाही,अशी चर्चा पण सुरू आहे,पण पोलीस अन्य कारणे दाखवून आरोपितांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.त्यामुळे अनेक जण अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाचे खेटे मारत आहेत.सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते,अशा भितीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारची कारवाई केल्यास वसई – विरार उपप्रदेशात असंतोषाचा भडका उडेल,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान राजीव पाटील यांचे एकेक मोहरे भाजपच्या गळाला लागत असल्यामुळे सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.नालासोपाऱ्याचे निलेश चौधरी हे राजीव पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सर्वांच्या भुवया वर गेल्या आहेत.येत्या ३ जाने.नंतर आयारामाना उत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.दरम्यान वसई विरार भागाच्या पाणीपुरवठा योजनेवर गेल्या पंधरा वर्षात झालेल्या अवाढव्य खर्चाचे लेखापरीक्षण व एस.टी.पी.( सिव्हरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट ) च्या तीनशे कोटी रु.आर्थिक निधीचा झालेला अपहार,याची चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहे.तर वीस दिवसापूर्वी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक जमील शेख यांनी पोलिसांच्या निवासासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर अतिक्रमण केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शेख याला कधीही अटक होऊ शकते.या सर्व हालचाली लक्षात घेता महायुतीने बहुजन विकास आघाडीला घेरण्याची जोरदार तयारी चालवली असल्याचे स्पष्ट होत आहे.

