दीपक मोहिते,
संपादकीय,
दोघा भावांची युती झाली खरी,पण ती किती काळ टिकणार ?
नॅशनल डेस्कसाठी,
तब्बल सतरा वर्षाच्या प्रदीर्घ वनवासानंतर अखेर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे घोडं एकदाचे गंगेत न्हालं,प्रभू रामचंद्राला १४ वर्षे वनवास भोगावा लागला.पण,या दोघा बंधूंना त्याहीपेक्षा अधिक काळ वनवास भोगावा लागला.आता या दोघांमध्ये दिलजमाई झाल्यामुळे या युतीमधून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.पण या दोघा भावांचे स्वभाव लक्षात घेता,हे दोघे भाऊ जास्त काळ एकत्र राहतील,असे वाटत नाही.सध्या एकत्र आले असले तरी यांची ही दिलजमाई किती काळ टिकेल,हे सांगणे जरा कठीणच आहे.
आम्हीच मराठी माणसाचे खरे राखणदार असल्याचा या दोघांचा दावा आहे.विकासाच्या प्रश्नी या दोघांमध्ये मतभिन्नता आहे,त्यामुळे भाजप या दोघांना किती काळ एकत्र टिकू देतील,यावर या दोघांच्या मनोमिलनाचे भवितव्य अवलंबून आहे.त्यांच्या युतीमुळे भाजप व शिंदे गट आता चांगलेच सक्रिय होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने स्टार प्रचारकाची फळी उभारली आहे,ती फळी या दोघांच्या पूर्वइतिहासाची उजळणी करणे म्हणा किंवा पाढा वाचण्यामध्ये कोणतीच कसर ठेवणार नाही.सत्तेत भागीदार नको,म्हणून आपापल्या वेगळ्या चुली मांडणारे हे दोघे भाऊ फार काळ एकत्र राहणार नाहीत,असा दावा करण्यास भाजपच्या थिंक टँकने सुरुवात केली आहे.त्यामुळे या दोघांना आपले प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे लागणार आहे.ही निवडणूक त्यांच्यासाठी जीवन मरणाची लढाईच आहे.भाजप,आपल्या विरोधकांवर इतिहासातील चुकांवर प्रहार करत आपले इप्सित साध्य करत असते.नेहरू – गांधी यांनी भूतकाळात काय केले,त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची गेल्या सहा दशकात कशी वाताहत झाली,याविषयी त्यांनी गेल्या बारा वर्षात रसभरीत वर्णने करत काँग्रेसची छबी पार विस्कळीत करून टाकली.आता या दोघा भावाच्या विरोधात ही मंडळी परप्रांतीय व मराठी भाषा/ मराठी अस्मिता,या दोन ज्वलंत मुद्यावर रान उठवण्याच्या तयारीत आहेत.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे व परप्रांतीयांना होणारी मारहाण,याचा त्यामध्ये समावेश असेल.मराठी भाषेचा सतत उदो उदो करणाऱ्या या दोघा भावानी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळवून दिला नाही.तसेच राज ठाकरे यांच्या विकासाचे मॉडेल कुठे गेले ? व्हिजनची ब्लु प्रिंट,मराठी माणसाला का पाहायला मिळाली नाही.असे एक ना अनेक मुद्दे भाजप व शिंदे गट प्रचारात हाताळणार आहेत.१९८४ साली झालेल्या गिरणी कामगारांच्या संपात शिवसेनेची भूमिका कशी होती व तो संप मोडून काढण्यासाठी सेनेने कोणाशी हातमिळवणी केली होती ? हा सारा इतिहास भाजप मराठी माणसासमोर आणण्याच्या तयारीत आहे.गुजराती,मारवाडी,
जैन,उत्तर भारतीय व दाक्षिणात्य जनतेच्या मनात या युतीबाबत असूया निर्माण व्हावी,यासाठी भाजप विविध हातखंडे वापरण्याच्या तयारीत आहे,आणि यामध्ये भाजप यशस्वी होईल,असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.शिवसेना व मनसे या दोघांना त्यांचा पूर्वइतिहास या निवडणुकीत त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,त्यांच्या सोबत जाण्यास तयार नाही.
तसेच या निवडणुकीत भाजपने मुस्लिम मते खाण्यासाठी आपली ” बी,” टीम ( एआयएमआयएम ) रिंगणात उतरवल्यामुळे काँग्रेसची परिस्थिती ” धरलं तर चावतं,सोडलं तर पळतं,” अशी झाली आहे.त्यामुळे या दोघांपासून त्यांनी स्वतःला लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

