दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
आमच्या नशिबी पक्षाच्या सतरंज्या उचलणेच का ? पक्षासाठी खस्ता खालेल्या भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश,
भाजपमध्ये बाहेरून आलेल्या आयारामाच्या मांदियाळीमुळे पक्षाचे जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.गेल्या महिन्यापासून विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहोळ्याला चांगलाच वेग आला आहे.दिवसागणिक हे सोहळे पार पडत आहेत.त्यांचबरोबर तालुक्याच्या भाजपामध्ये सध्या सरळ दोन गट पडले असून हे दोन्ही गट अनुक्रमे मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय स्तरावर सक्रिय असलेले विनोद तावडे यांच्या गटात विभागले गेले आहेत.दुसरे राजकीय पक्ष फोडून पक्षप्रवेशाचे होणारे सोहळे हे जुन्याजाणत्या संघियांना मान्य नाही.तसेच पक्षप्रवेशाचा हा वेग पाहून प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते सध्या भयभीत झाले आहेत.या आयारामाना उमेदवारी देण्याचे तोंडी आश्वासन दिले जात आहे.ही आश्वासने प्रत्यक्षात खरी ठरली तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात लाथाळ्या सुरु होतील,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.सध्या येणाऱ्यांच्या संख्येचा वेलू गगनावर गेला आहे.पक्ष उभारणीच्या काळात आम्ही आमचे सर्वस्व झोकून दिले,वेळप्रसंगी आमच्यावर गुन्हे दाखल झाले.पण आता पक्षाला सुगीचे दिवस आल्यानंतर आम्हाला अडगळीत टाकण्यात येत असल्याची भावना कार्यकर्त्याध्ये वाढीला लागली आहे.

पक्षाच्या पडत्या काळात आम्ही खस्ता खाल्या.पण आज आम्हाला पक्षात कोणी विचारत नाही.आम्ही आयुष्यभर सतरंज्या उचलत राहायच्या का ? नव्याने दाखल होणाऱ्यांना पक्षाची महत्वाची पदे व आगामी निवडणुकीत जर उमेदवारी मिळत असेल तर आम्ही पक्षनिष्ठेच्या नावाखाली आणखी किती दिवस केवळ अंधभक्त म्हणून वावरायचे ? असा आक्रोश भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते करू लागले आहेत.आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही बंडखोरी करू.प्रथम निष्ठावंत कार्यकर्त्याला प्राधान्य द्या,अन्यथा बंडखोरी सहन करा,आशा निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.आता यापूढे सतरंज्या उचलण्याचे काम आम्ही करणार नाही,असा निर्धार,या कार्यकर्त्यांनी केला आहे.
शिस्तबद्ध अशी ओळख असलेल्या भाजपमध्ये या सर्व घडामोडीमुळे या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.निष्ठावंताना डावलण्यात आले तर या निवडणुकीत भाजपला अनेक जागांवर धोका होऊ शकतो.

