दिपक मोहिते,
बविआच्या ” बी,” टीमने निदान आता तरी बोध घ्यायला हवा,
आजपासून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.या निवडणुकीसाठी हजारो इच्छुकांची गर्दी झाली आहे.एकूण ११५ जागांसाठी बहुजन विकास आघाडी व भाजप- शिवसेना ( शिंदे गट ) या दोन्ही पक्षांकडे सरासरी ६०० इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपले अर्ज सादर केले आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले अभूतपूर्व यश लक्षात घेऊन इच्छुकांनी या भाजपकडे चांगलीच भाऊगर्दी केली आहे.त्यामुळे उमेदवारांची निवड करताना पक्षाच्या वरीष्ठ मंडळींना आता तारेवरची कसरत करावी तर लागणारच आहे,पण उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांची समजूत काढण्याच्या दिव्यातूनही त्यांना जावे लागणार आहे.भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोन्ही पक्षात उमेदवारी मिळवण्यासाठी जुने व नव्याने दाखल झालेले विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये घनघोर संघर्ष उडण्याची शक्यता आहे.दुसऱ्या पक्षाचे मोहरे गळाला लावण्याचे प्रकार पुढे जाऊन किती त्रासदायक ठरतात,याचा अनुभव भाजपचे वरिष्ठ नेते सध्या पावलोपावली घेत आहेत.या अडचणीतून ते कसा मार्ग काढतात,यावर सारे काही अवलंबून आहे.भाजपने गेल्या तीन महिन्यापासून बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक,पदाधिकारी कार्यकर्त्याना फोडण्याचे सत्र आरंभले आहे.या माध्यमातून बहुजन विकास आघाडीला खिळखिळे करण्याचे त्यांचे प्रयत्न होते,ते मोठ्याप्रमाणात यशस्वी देखील झाले.पण,आता मात्र फोडाफोडीचे राजकारण त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.बाहेरून आलेल्यानाही उमेदवारीचे डोहाळे लागल्यामुळे जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.हा तिढा सोडवताना नेतेमंडळीची चांगलीच दमछाक होणार आहे.ही सारी परिस्थिती लक्षात घेता भाजपमध्ये बंडखोरी रुपी कोरोनाचा व्हायरस वेगाने पसरण्याची शक्यता आहे.अनेक निष्ठावंत कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.हे आव्हान भाजप कसे पेलते,यावर
सारे काही अवलंबून आहे.
तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीला खिळखिळी करण्यात भाजप यशस्वी ठरला असला तरी आघाडीकडेही उमेदवारीसाठी अक्षरशः रांग लागली आहे.येत्या काही दिवसात भाजप,बहुजन विकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या तयारीत आहे.या निवडणुकीत भाजपला बाजी मारता येऊ नये,यासाठी माजी आ.हितेंद्र ठाकूर हे तब्येत साथ देत नसतानाही बाहेर पडले असून त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे.त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाले आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर हे फाजील आत्मविश्वास बाळगून होते.त्यांनी वसई विधानसभा मतदारसंघात त्यावेळी प्रभावी प्रचार केला असता तर वर्षानुवर्षे ताब्यात असलेली ही जागा भाजपच्या ताब्यात गेली नसती.पण ते त्यावेळी खूप गाफील राहिले,त्याचे चांगलेच परिणाम त्यांना भोगावे लागले.आजच्या घडीला त्यांच्यानंतर पक्षाची धुरा यशस्वीरीत्या पेलणारी व्यक्ती पक्षात नसल्यामुळे ठाकूर यांना पुन्हा सक्रिय व्हावे लागले आहे.त्यांचे पुन्हा सक्रिय होणे,हे इच्छुकांसाठी एक आशेचा किरण ठरला आहे.त्यामुळे पक्षात उमेदवारीसाठी शेकडो अर्ज सादर झाले आहेत.बहुजन विकास आघाडीत सर्व जाती धर्माचे लोक व विविध घटकांना सोबत घेऊन राजकारण करण्यामध्ये हितेंद्र ठाकूर यांचा हात पकडू शकेल,असा एकही नेता त्यांच्या पक्षात निर्माण होऊ शकला नाही,ही खऱ्या अर्थाने दुर्देवाची बाब आहे.या सर्व अनुभवातून त्यांच्या पक्षाच्या ” बी,” टीमने बोध घ्यायला हवा.

