दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कालच्या निकालाने विरोधी पक्षांवर भितीचे सावट,
अपेक्षेप्रमाणे महायुतीने पालघर जिल्ह्यात चांगली मुसंडी मारल्याचे काल लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) हे स्वतंत्रपणे लढले असले तरी हे दोघेही सत्तेत एकत्रपणे पाहायला मिळतील.या दोघांनी जिल्ह्यात मिळवलेले यश हे विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.ही पहिली घंटा असून महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुसरी तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकी दरम्यान तिसरी घंटा वाजणार आहे.त्यामुळे विरोधकामध्ये सध्या चलबिचल झालेली पाहायला मिळत आहे.
काल लागलेल्या निकालाने विरोधी पक्षांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.शिवसेना ( शिंदे गट ) व भाजप,हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तरी त्यांची कामगिरी सरसच ठरली.येणाऱ्या काळात जर ते एकत्रपणे लढले तर आपले काय होईल ? त्यांच्यासमोर आपला टिकाव लागेल का ? अशा दोन प्रश्नांनी विरोधी पक्षांना भंडावून सोडले आहे.पालघर तालुका हा शिंदे गटाचा गड म्हणून ओळखला जातो.अगदी एकसंघ शिवसेनेत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात पक्षाची चांगली बांधणी केली.पक्षाच्या महत्वाच्या पदावर आपल्या विश्वासू सहकाऱ्यांची त्यांनी वर्णी लावली.त्यामुळे पक्षफुटीनंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली.या सर्व घडामोडीमुळे मूळ शिवसेनेचा तंबू ओस पडला.या सर्व घडामोडींचा शिंदे गटाला चांगलाच फायदा झाला.या निकालाने भाजपलाही जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाची ताकद कळून चुकली. आज हे दोघे स्वतंत्रपणे लढले असले तरी भविष्यात हे दोघेही महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या आखाड्यात पहायला मिळतील. महानगरपालिका व जिल्हा परिषद/पंचायत समित्यांच्या निवडणुकीत हे दोघे एकत्रितपणे लढले तर विरोधकांची ” पळता भुई थोडी,” होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे या निकालामुळे शिंदे गटाला जागावाटपात डावलून चालणार नाही,हे भाजपलाही आता उमगले आहे.डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाने भाजपच्या भरत राजपूत यांना धूळ चारली. गेल्या दोन ते तीन वर्षात या भरत राजपूत यांनी शिंदे गटाला चांगलेच डिवचले होते.त्यांनी शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते फोडले.तसेच मित्रपक्ष म्हणून जी वागणूक त्यांनी द्यायला हवी होती,ती न देता त्यांनी शिंदे गटाला कायम त्रास दिला.एकनाथ शिंदे यांनी याविषयी वर्षभरात चकार शब्द काढला नाही.मात्र या निवडणुकीत शिकार टप्यात आल्यानंतर थेट शिकार केली.शिंदे यांनी त्यासाठी आपल्या शत्रूशी हातमिळवणी केली व रजपूत यांच्या राजकारणाची इतिश्री केली.राजकारणात अहंकाराला स्थान नसते,हे या घडामोडीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.पालघरमध्ये भाजपला आपल्या ताकदीचा अंदाज आला नाही.विधानसभा निवडणुकीत राजेंद्र गावित व विलास तरे यांना मिळालेल्या मताकडे दुर्लक्ष करणे,मुळात चुकीचे होते.त्यामुळे त्यांना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या शहरात नामुष्की पत्करावी लागली.आता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना ( उबाठा ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.पण कालच्या निकालातून या सर्व पक्षांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.त्यामुळे महानगरपालिकेच्या या निवडणुकीत त्यांना भाजप व शिंदे गटाला रोखणे शक्य होणार नाही.कारण लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने बविआचे अनेक पदाधिकारी गळाला लावत त्यांच्या पक्षाचे खच्चीकरण करण्यात चांगलेच यश प्राप्त केले आहे.तर शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षाचे अस्तित्व हे या निवडणुकीनंतर नाममात्र राहण्याची शक्यता आहे.

