दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजपची किमया ; कालचे शत्रू,आज जिवलग मित्र,
राजकरणात कोणी,कधी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो,या वाक्याचा सध्या वसई तालुक्यात पावलोपावली अनुभव येत आहे.गेली दिन दशके हितेंद्र ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी एकेकाळी ज्या साऱ्या राजकीय पक्षांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते,त्या पक्षाचे नेते आज हितेंद्र ठाकूर यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळतात.हा नियतीने उगवलेला एकप्रकारचा सूडच म्हणावा लागेल.ठाकुर यांचा ” दहशतवाद व टँकर लॉबी,” या दोन शब्दाचा आधार घेत कायम रान उठवणारे विरोधी पक्ष आज आपले अस्तित्व टिकून राहावे,यासाठी जिवाच्या आकांताने धडपडत आहेत.ही सारी किमया भाजपच्या झंझावातामुळे शक्य झाली आहे.
भाजपच्या भितीमुळे राजकीय पक्षांना आपली ध्येये व धोरणांना मुरड घालावी लागत आहे.हे सारे पक्ष एकत्र येऊन भाजपला सामोरे जाण्याच्या तयारीत जरी असले तरी या पक्षाचे माजी नगरसेवक/नगरसेविका,पदाधिकारी व कार्यकर्त्याना आपण या निवडणुकीत निवडून येऊ शकू,याविषयी खात्री वाटत नाही.त्यामुळे दिवसागणिक ही मंडळी भाजपमध्ये डेरेदाखल होत आहेत.तीन वर्षांपूर्वी जूचंद्र- नायगाव येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात काँग्रेसचे नेते विजय पाटील व हितेंद्र ठाकूर या दोघांमध्ये रंगलेला कलगीतुरा आजही लोक विसरलेले नाहीत.आज तेच पाटील व ठाकूर एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत.त्यावेळी विजय पाटील यांनी बहुजन विकास आघाडीवर केलेले बेछूट आरोप व त्या आरोपाना उत्तर देताना ठाकूर यांचा झालेला रुद्रावतार आजही लोकांच्या आठवणीत आहे.या सर्व घडामोडी ” राजकारणात कधीही काहीही घडू शकते,” यावर शिक्कामोर्तब करणारे आहे.आज या दोघांसमोर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे.” झालं गेलं,गंगेला मिळाले,” या उक्तीनुसार आता ही मंडळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आहेत.पण,ही जी काही आघाडी नव्याने आकाराला येत आहे,ती विश्वासाच्या आधारावर होत आहे,असे म्हणता येणार नाही,कारण या निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा ” ये रे माझ्या मागल्या,” असेच होणार आहे.भाजपचा अश्वमेघ घोडा रोखण्यासाठी ही तात्पुरती व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे,ती चिरकाल टिकेल,याची खात्रीही देता येत नाही.

