दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आघाडी होण्याऐवजी बिघाडीचीच शक्यता अधिक,
एकेकाळचे कट्टर शत्रू आता भाजपच्या भितीमुळे गळ्यात गळा घालून हिंडू लागले आहेत.मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या गळ्यात हे ” नको ते घोंगडे,” अडकवून घ्यायला तयार नाही.मागचा इतिहास लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते या नव्या महाविकास आघाडीपासून लांब राहण्याच्या मानसिकतेत आले आहे.शरद पवार गटाचे शहरी भागात अस्तित्व नगण्य असल्यामुळे त्यांना फारसे कोणी गृहीत धरत नाही.
९० च्या दशकात माजी आ.ठाकूर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित केल्यानंतर ठाकूर यांनी जुन्या काँग्रेसजनांना हाताशी धरून वसई तालुक्यात आपली वेगळी चूल मांडली.ठाकूर यांनी त्यावेळी केलेल्या खेळीने काँग्रेस पक्षाचा अक्षरशः पालापाचोळा झाला.त्यातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आजही तालुक्यात स्वतःला सावरू शकलेली नाही,हा अनुभव लक्षात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा या निवडणुकीत एकत्र येण्यास विरोध आहे.ज्यांनी आपला पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला,आज त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसायचे ? असे या काँग्रेसजनाचे म्हणणे आहे.तसेच उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत राज ठाकरे यांना सोबत घेण्याचे ठरवल्यामुळे महाविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दरी निर्माण झाली आहे.
त्यामुळे काल सेनेचे पोतनीस व ठाकूर यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या बैठकीला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यानी दांडी मारली होती.कालच्या या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. शिवसेना ( उबाठा ) व बहुजन विकास आघाडी हे किती काळ एकत्र संसार करतील,हे सांगणे देखील कठीण आहे.भाजपला रोखण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येत असले,तरी या दोनही पक्षाची ताकद अगदी क्षीण झाली आहे.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची चांगलीच घसरण झाली आहे.या तालुक्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना ठाकूर यांच्या झंझावातासमोर प्रभावी कामगिरी करता आली नाही.लोकसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांना चांगली मते मिळतात,मात्र विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना मतदार बिलकुल थारा देत नाहीत,असा आजवरचा अनुभव आहे.त्यामुळे हे दोघे या निवडणुकीत एकत्र आले तरी भाजपला ते धक्का देऊ शकणार नाहीत.या तालुक्यात भाजपची व्होटबँक गेल्या तीन वर्षात चांगलीच मजबूत झाली आहे.( उत्तर भारतीय,गुजराती,मारवाडी व दाक्षिणात्य ) त्या व्होटबँकेला उद्धव ठाकरे व ठाकूर धक्का देऊ शकणार नाही.या तालुक्यात मनसेला सोबत घेणे,हे आत्महत्या करण्यासारखे आहे.त्यांना जर सोबत घेतले तर ते भाजपला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.त्यामुळे काँग्रेस या आघाडीपासून दोन हात लांब राहण्यात धन्यता मानत आहे.तसेच ठाकूर व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आघाडी झाली तर ख्रिस्ती मते बहुजन विकास आघाडीपासून १०० % दुरावतील.या तालुक्यातील ख्रिस्ती समाज,हा कधीही सेनेला मतदान करत नाही.त्यामुळे ही आघाडी झाली तर बहुजन विकास आघाडीला फटका बसू शकतो.तसेच ही आघाडी आकाराला येण्यापूर्वी जागा वाटपावरून फुटण्याची देखील शक्यता आहे.या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी सेनेला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत जागा देईल,व त्या सेनेला मान्य होणार नाहीत.त्यामुळे आघाडी होण्याऐवजी बिघाडीचीच जास्त शक्यता आहे.या पूर्वी काँग्रेसने बविआ सोबत आघाडी केली होती,पण त्यांना तोंडघशी पडावे लागले होते,तसाच अनुभव सेनेला येण्याची शक्यता आहे.दुसरीकडे भाजप व शिंदे गटांनी ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचे ठरवले आहे.भाजप,आपल्याला ज्या जागा देतील,त्यावर समाधान मानण्याची तयारी शिंदे गटाने ठेवल्यामुळे ही निवडणूक त्यांना जड जाणार नाही,असे वाटते.

