दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
नॅशनल डेस्क,दिल्लीसाठी,
ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता…
महायुतीमधील भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्यातील मतभेदाना मूठमाती देत स्था.स्व.संस्थांच्या आगामी निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.यामागे शिवसेनेच्या ( उबाठा ) आर्थिक नाड्या आवळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.आजच्या घडीला उद्धव ठाकरे हे या दोघांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याचा बुरखा सातत्याने फाडत आहेत.त्यामुळे या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष सध्या इरेला पेटले आहेत.प.महाराष्ट्र वगळता इतर प्रांतात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फारसे प्राबल्य नसल्यामुळे या गटाला त्यांनी या निवडणुकीत सोबत घेतलेले नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ( उबाठा ) मुसक्या बांधल्या की भविष्यात आपली राजकीय वाटचाल बिनबोभाट होईल,हे गृहीत धरून भाजपचे वरिष्ठ नेते रणनिती आखत आहे.गेल्या साडेतीन वर्षात भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेना पार खिळखिळी केली.या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पराभव करण्यात यशस्वी ठरले तर मुंबई व कालांतराने ठाण्यातील मराठी माणूस हा औषधाला देखील शिल्लक उरणार नाही.त्यामुळे ही लढाई मराठी माणसाच्या जीवन मरणाची आहे,असे फलक शिवसेनेने नुकतेच मुंबईत लावले होते.
पण,हे सर्व फलक मुंबई महानगरपालिकेने तातडीने हटवले.शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे व मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे दोघेही आपल्या भाषणात सातत्याने ही लढाई मराठी माणसाचे अस्तित्व व अस्मिताची असल्याचे मराठी माणसाच्या मनावर बिंबवत असतात.राज ठाकरे यांच्याशी अनेक मुद्द्यावर तीव्र स्वरूपाचे मतभेद असतानाही उद्धव ठाकरे यांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे.पण,त्याचवेळी दुसरीकडे जैन,मारवाडी,दाक्षिणात्य व उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो.तसेच वरील समाजाची मते शिंदे गटालाही मिळण्याची शक्यता नाही.राज ठाकरे यांना सोबत घेणे,म्हणजे महाविकास आघाडीने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपले पत्ते अद्याप खोललेले नाहीत.पक्षाच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.आम्हाला राज ठाकरे यांना सोबत घेणे,मान्य नाही.त्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही,अशी भूमिका जाहीरपणे मांडली आहे.राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या प्रश्नावरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडी फुटण्याची शक्यता आहे.

