दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजपची ” बी,” टीम,वसई तालुक्याच्या उंबरठ्यावर…
ऑल इंडिया मुस्लिम इत्तेहादू मुसलमीन,या पक्षाचे पालघर जिल्ह्यात झालेले आगमन व त्यांच्या काल झालेल्या जाहीर सभेला तरुणांची झालेली लक्षणीय गर्दी,ही भल्याभल्या राजकीय नेत्यांची झोप उडवणारी अशीच होती.त्यांचे प्रदेशाध्यक्ष व छ.संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाझ जलील यांनी केलेले पहिले भाषण तरुणांमध्ये उत्साह वाढवणारे असेच होते.त्यांच्या या आगमनाचे भाजपने महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आपली ” बी,” उतरवल्याची चर्चा सर्वत्र होत होती.तशी ती ” बी,” टीम असेल तर वसई तालुक्याची राजकीय समीकरणे बदलण्याची ती चिन्हे आहेत,असे समजायला हरकत नाही.
वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात मुस्लिम व दलित समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून हा समाज पूर्वी कायम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीशी असायचा.१९९० च्या नंतरच्या काळात तब्बल तीन दशके या दोन्ही समाजाने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत बहुजन विकास आघाडीची पाठराखण केली.मात्र गेल्या निवडणुकीत त्यांच्या मतांचे मोठ्याप्रमाणात ध्रुवीकरण झाले व बहुजन विकास आघाडीला त्याचा चांगलाच फटका बसला.नालासोपारा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या पराभवाला या समाजाने भरीव प्रमाणात हातभार लावला.नालासोपारा शहरातील वाझा मोहोल्ला,वसई गाव,कामण,विरार पूर्व,अर्नाळा,आगाशी, बोळींज या भागात या समाजाची बऱ्यापैकी पॉकेट्स आहेत.त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत हा पक्ष भाजप वगळता इतर पक्षाना न्यूसन्स व्हॅल्यू ठरू शकतो.त्याचा सर्वाधिक फटका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडीला बसू शकतो.काल झालेल्या जाहीर सभेत इम्तियाझ जलील यांनी तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नावर टीकेची चांगलीच झोड उठवली,त्यांच्या या अशा आक्रमक पवित्र्यामुळे त्यांचे टार्गेट भाजप नसून बहुजन विकास आघाडी असल्याचे स्पष्ट होत आहे.एएमआयएमच्या आगमनामुळे हिंदू मते ही भाजपच्यामागे एकवटण्याची शक्यता आहे.या निमित्ताने भाजपचा दुहेरी फायदा होणार आहे.गेली तीन दशके बहुजन विकास आघाडीची असलेली मतपेटी फुटणे व या पक्षाचा बागूलबुवा उभा करून हिंदूंची एकगठ्ठा मताची बिदागी मिळवणे,असे हे दुहेरी फायदे आहेत.

