दीपक मोहिते,
निवडणुकीचे वेध,
वसई विरारमध्ये आम्ही मोठे भाऊ ; ठाकुरानी फासे फेकले…
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच शह – काटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.बहुजन विकास आघाडीने पराभवाच्या भितीमुळे महाविकास आघाडीशी सोयरीक करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.पण,ते कितपत यशस्वी ठरतील,हे आजच्या घडीला सांगणे कठीण आहे.पण,बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेले हितेंद्र ठाकूर यांनी ” वसई विरारमध्ये आम्ही मोठे भाऊ,तर जिल्ह्यात लहान भावाच्या भूमिकेत असू,” असे जाहीर केल्यामुळे ही सोयरीक किती काळ टिकेल,हे सांगणे जरा कठीणच आहे.लग्नाच्या बोहोल्यावर चढण्यापूर्वीच मांडव तुटून पडण्याची शक्यता अधिक आहे.

दुसरीकडे वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडी हे दोघेही एकमेकांच्या कुबड्या घेऊन रिंगणात धडपडत का होईना,पण उभे राहण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहून भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) स्वबळावर लढण्याऐवजी युतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे गेल्या दोन दिवसात झालेल्या घडामोडीवरून स्पष्ट झाले आहे.भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) हे दोन्ही पक्ष या निवडणुकीसंदर्भात कोणताही धोका पत्कारायला तयार नाहीत,हे सर्व घडामोडीवरून स्पष्ट होत आहे.वसई विरार भागात आम्ही मोठे भाऊ म्हणून वागणार आहोत,हे हितेंद्र ठाकूर यांचे वक्तव्य महाविकास आघाडीतील शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला परवडेल,असे वाटत नाही.बहुजन विकास आघाडीचा आजवरचा अनुभव लक्षात घेता महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे व हर्षवर्धन सपकाळ हे दोघेही बहुजन विकास आघाडीला मोठा भाऊ मानायला सहजासहजी तयार होणार नाहीत.कारण,हितेंद्र ठाकूर हे स्वतःला मोठा भाऊ म्हणवून घेताना महाविकास आघाडीला फारशा जागा सोडतील,अशी शक्यता वाटत नाही आणि समजा त्यांनी काही जागा सोडल्या तरी ते आपल्या उमेदवारांना अपक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध
निवडणूक लढवायला लावतील.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव होण्याची शक्यता आहे.काही वर्षांपूर्वी हितेंद्र ठाकूर यांनी अशी खेळी करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर नामुष्कीची पाळी आणली होती.या कटू अनुभवानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कधीही घरोबा केला नाही.या निवडणुकीत उद्धव ठाकरे व हर्षवर्धन सपकाळ हे दोघे आता ताकही फुंकून पिण्याच्या मनस्थितीत आले आहेत.महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना अधिक जागा द्यायला लागू नयेत,यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी सध्या फासे फेकले आहेत.त्यामध्ये महाविकास आघाडी किती अडकते,यावर येथे होणाऱ्या आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

