दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
पापाचा घडा भरतो,तेंव्हा नियतीची कुऱ्हाड कोसळतेच….
दोन दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एका वादग्रस्त व भ्रष्ट असलेल्या प्रभारी सहा.आयुक्ताला पोलिसांनी गजाआड केले.हा अधिकारी गेल्या काही वर्षांपासून आपल्या भ्रष्ट कारभारामुळे वादग्रस्त ठरला होता.वास्तविक त्याच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती.पण,त्याला सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याचे संरक्षण असल्यामुळे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त त्याच्यावर कारवाई करण्यास धजावत नव्हते.या नेत्यामुळेच त्याला अनेक मलईदार प्रभाग समित्या लाभल्या.या अधिकाऱ्याला पोलिसांनी आपला हिसका दाखवला तर त्याच्या पाठीशी असलेल्या राजकीय नेत्याचा काळाकुट्ट चेहरा समोर येऊ शकेल.
या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे १७ निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला.एकेकाळी नवघर – माणिकपूर नगरपरिषदेत लिपिक पदावर काम करणाऱ्या नालायक माणसाला एका नेत्यांकडून राजाश्रय मिळाल्यामुळे गेल्या दहा वर्षात प्रशासकीय यंत्रणेत त्याचा हेवा वाटेल,असा प्रवास होत गेला.या नेत्यांची थुंकी झेलणारा अशी त्याची ख्याती निर्माण झाली होती.या नेत्याला त्याच्यापासून कोणता फायदा होत होता,हे या अधिकाऱ्याला पोलिसांनी हिसका दाखवला तर तो पोपटासारखा बोलायला लागेल.असो,त्याने आपल्या नोकरीच्या काळात कोणकोणती कृष्णकृत्ये केली व त्याच्या या पाठीराखा नेत्याने त्याला कसे पाठीशी घातले,याच्या सुरस कथा यथावकाश बाहेर येतीलच,तेव्हा या तालुक्यातील करदात्यांचे डोळे नक्कीच पांढरे होतील.
गिल्सन गोंसालवीस असे या नराधम अधिकाऱ्याचे नांव आहे.लिपिक म्हणून तत्कालीन नगरपरिषदेत काम करणारी ही व्यक्ती गेल्या दहा वर्षात अनेक लाभाच्या प्रभाग समित्या एकामागोमाग मिळवतो व अल्पावधीत आलिशान बंगला बांधतो.हे त्यांनी कसे शक्य केले ? याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे.कारण,हा पैसा करदात्यांच्या कष्टाचा पैसा आहे.तसेच यामागे अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांचाही काळा पैसा आहे.त्यामुळे पोलीस व अन्य तपास यंत्रणांनी याला ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे.ही महानगरपालिका आपल्याला लुटीसाठी आंदण दिली आहे,असे समजून अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधींनी आजवर करदात्यांच्या पैश्याची प्रचंड लूट केली.आयुक्त,नगररचनाकर,बांधकाम अभियंता,प्रभाग समित्यांचे ठेक्यावरील अभियंते,प्रभारी सहा.आयुक्त व नगरसेवक या सर्वांनी गेल्या दहा वर्षात महानगरपालिका अक्षरशः लुटून खाल्ली.आजही तेच सुरू आहे.जुने बदलले आता नवीन आले,पण भ्रष्ट कामकाज ” मागच्या पानावरुन पुढील पानावर,” अशा पद्धतीने सुरूच राहिले आहे.असे अनेक गिल्सन गोंसालवीस या महानगरपालिकेत दडून बसले आहेत.त्यांना हुडकून काढून त्यांच्या नांग्या ठेचायचं काम तपास यंत्रणानी करायला हवे,तरच या महानगरपालिकेत होणारा हजारो कोटीचा भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
गिल्सन गोंसालवीस हा एक प्यादे असून त्याच्यामागे असलेला राजा व वझीर शोधून काढल्यास खूप काही बाहेर येऊ शकते.या प्रकरणावरून एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे पापाचा घडा कधी ना कधी भरतोच,कारण नियती ही कधीच कोणाला सोडत नाही.अशा पैशाने क्षणिक सुख मिळते खरे,पण शेवट फार वाईट होत असतो.पोलीस जेंव्हा अशा लोकांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेतात,तेंव्हा त्यांना तोंडावर रुमाल टाकून आपला चेहरा लपवावा लागतो,कारण त्यांनी पापाचा पैसा कमावलेला असतो…

