दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
… मग हे सरकार,” गतिमान,” कसे ?
गेल्या दोन दिवसांपासून फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीचे सोहळे राज्यात वाजत गाजत साजरे होत आहेत.त्यासाठी राज्यात सर्वत्र मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत.त्यांचे सरकार किती गतिमान आहे,याविषयी महायुतीचे नेते सध्या गोडवे गात आहेत.अनेक नेत्यानी आपल्या सरकारला दहापैकी दहा गुण देखील देऊन टाकले.परंतु फडणवीस सरकारच्या राज्यात सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे किती प्रश्न मार्गी लावले,शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का ? महागाई कमी झाली का ? वर्षभरात किती रोजगारनिर्मिती झाली ? राज्यातील गुन्हेगारी कमी झाली का ? भ्रष्टचारावर नियंत्रण आले का ? या सर्व प्रश्नाची उत्तरे केवळ नकारार्थीच मिळतात.मग हे सरकार गतिमान कसे,असा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या मनात उभा राहतो.कारण वरील सर्व प्रश्नाचा थेट संबंध तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे.
आजच्या घडीला राज्यावर सुमारे नऊ लाख कोटी रु.च्या कर्जाचा बोझा आहे,हा बोझा सतत वाढतोय.भविष्यात या कर्जाचे व्याज देणेही सरकारला कठीण होणार आहे.लाडक्या बहिणींना खुष करून या सरकारने आपली राजकीय पोळी भाजून घेतली.पण सरकारचे लाडक्या बहिणीवरील उतू गेलेले हे प्रेम राज्याला आर्थिक खाईत ढकलणारे ठरले.राज्याची तिजोरी रिकामी करण्याचे काम या देवभाऊंच्या सरकारने केले.अन्य विभागाचा निधी या योजनेसाठी वापरल्यामुळे राज्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला व गेल्या वर्षभरात राज्याच्या विकासाचा वेग चांगलाच मंदावला.पण देवाभाऊचे सरकार,हे गतिमान सरकार असल्याचा ढोल बडवण्यात धन्यता मानत आहे.ग्रामीण भागातील जनता आजही अन्न,वस्त्र व निवारा या तीन मूलभूत गरजापासून वंचित आहे.गेल्या वर्षभरात या गतिमान सरकारने ६०० शाळा बंद केल्या.सवंग लोकप्रियतेसाठी सुरू केलेला ” आनंदाचा शिधा,” सरकारने निधी अभावी बासनात गुंडाळला.लाडकी बहीण योजना देखील शेवटचे आचके देऊ लागली आहे,तरी सरकार म्हणते,आमचे सरकार हे ” गतिमान,” सरकार आहे.एसटी कर्मचाऱ्याचे पगार सतत रखडत आहेत,ठेकेदारांची हजारो कोटी रु.ची देयके गेले अनेक महिने रखडली आहेत,अंगणवाडी सेविकांचे अनुदान रखडले आहे,शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नाही आणि खर्चाचा ताळमेळ जुळवताना सरकारला तारेवरच्या कसरती कराव्या लागतात,मग हे सरकार गतिमान कसे ? हे तर लोकांची दिशाभूल करणारे सरकार आहे,असे म्हंटल्यास ते वावगं ठरू नये.

