दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजप,बहुजन विकास आघाडीला खिंडीत पकडत आहे,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने बविआला खिळखिळा करण्याचा जणू विडाच उचलला आहे.गेल्या महिन्याभरात त्यांचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी आपल्या जाळ्यात ओढले.वास्तविक,
भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाची कुणकुण लागताच बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी त्वरित हालचाल करण्याची गरज होती.आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी,त्यांना ओळखता यायला हवी होती.गेली तीन दशके तालुक्यात वर्चस्व राखणारे तसेच राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले हितेंद्र ठाकूर हे गेल्या दोन वर्षांपासून चांगलेच गाफील राहिले.तसेच प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी पक्षाची धुरा हळूहळू आपल्या मुलाकडे सोपवली.त्यामुळे पक्षाच्या दोन जनरेशनमध्ये मोठी दरी निर्माण झाली.राजकारण व समाजकारण करताना सर्वांना सोबत घेऊन काम करणे,अनिवार्य असते.पण तसे झाले नाही,त्यामुळे नाराज असलेल्या समूहामध्ये दिवसेंदिवस वाढ होत गेली.
आज अशा नाराजाना भाजप आपलेसे करू लागला आहे.दोन वर्षांपूर्वी त्यांच्या एका मित्राने,ठाकूर यांना भाजपने पोखरायला सुरुवात केली आहे.आणि वसईकर जनता,बविआला पर्याय म्हणून भाजपकडे पाहू लागला आहे,हे वारंवार सांगत होता.पण,त्याचा काही उपयोग झाला नाही.लोकसभा निवडणुकीनंतर ठाकूर यांनी सावध व्हायला हवे होते.पण तेही झाले नाही.त्याचे विपरीत परिणाम विधानसभा निवडणुकीत त्यांना भोगावे लागले.पक्षांतर्गत जी काही नाराजी होती,ती त्यांच्यापर्यंत त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी पोहोचू दिली नाही.त्यामुळे आज भाजप नाराज मंडळीना लक्ष्य करत आहे.विरोधी पक्षातील ” असंतुष्ट आत्मे,” भाजप कायम शोधत असतो.हीच निती अवलंबत भाजपने उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षाची वाताहत केली.आज ज्या लोकांना भाजप जवळ करत आहे,ते त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून जवळ करत नाही.तर त्यांचा पक्ष खिळखिळा करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.ही महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वप्रथम बहुजन विकास आघाडीला त्यांनी लक्ष्य केले आहे.अशा परिस्थितीमध्ये ठाकूर,हे देखील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे ” जाणाऱ्यांना जाऊ द्या,आपल्याला काही फरक पडत नाही,”अशा मानसिकतेत आहेत.खरं तर जाणाऱ्यांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा होता.अजूनही वेळ गेलेली त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधायला सुरुवात करायला हवी,दुसरे म्हणजे आपल्या जवळ असलेल्या हवशे नवशाना दूर लोटायला हवे.कल्पक पाटील यांनी भाजपच्या कळपात दाखल होऊन,हे किती गरजेचे आहे,हे दाखवून दिले आहे.
काल बहुजन विकास आघाडीचे चार नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.या सर्वांचे चव्हाण यांनी स्वागत केले.मोठ्याप्रमाणात झालेला हा पक्षप्रवेश माजी आ.हितेंद्र ठाकूर यांना जोरदार दणका देणारा ठरला आहे.
आज झालेल्या पक्षप्रवेश करणाऱ्यामध्ये माजी नगरसेवक राजू ढगे त्यांच्या पत्नी रसिका ढगे,वसई विरार शहर महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती माया चौधरी,माजी नगरसेविका ज्योती राऊत,वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे सभापती कल्पक पाटील,राजेश राऊत व अन्य शंभर ते सव्वाशे कार्यकर्ते आज भाजपमध्ये सामील झाले.यावेळी नालासोपाऱ्याचे आ.राजन नाईक,जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील व भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.माया चौधरी व कल्पक पाटील या दोघांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणे,हा माजी आ.हितेंद्र ठाकूर याना भाजपने जोरदार झटका दिल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.या पक्षप्रवेशा नंतर येत्या काही दिवसात बहुजन विकास आघाडीचे आणखी काही पदाधिकारी,२२ माजी नगरसेवक व ७ माजी नगरसेविका भाजपच्या तंबूत सामील होणार आहेत.महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप,हा बहुजन विकास आघाडीचा तंबू अर्ध्याहुन अधिक रिकामा करण्याच्या प्रयत्नात आहे.बविआला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारच मिळू नये,अशी परीस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.आज झालेल्या या पक्षप्रवेशाच्या सोहोळ्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या गोटात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

