दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
मतमोजणी पुढे ढकलणे,मतदारांच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली करण्यासारखे….
केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारभार दिवसेंदिवस सैरभैर होत असून त्याचा फटका सर्वसामान्य मतदार व राजकीय पक्षांना बसत आहे.अशा या बदनाम केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष सातत्याने आगपाखड करत असतात.यंदा भाजप,हा प्रथमच आयोगावर तुटून पडला आहे.एरवी भाजप आयोगाची बाजू घेऊन विरोधकांना खडे बोल सूनवत होता.तोच भाजप आता आयोगाला खडे बोल सूनवु लागला आहे.भाजपच्या वागण्यात अचानक झालेला बदल हे सारे विस्मयजनकच आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गेल्या बारा वर्षातील कारभार पाहता या संस्थेची विश्वासार्हता व पारदर्शकता पार रसातळाला गेल्याचा अनुभव मतदारांनी पावलोपावली घेतला.अनेक प्रकरणी त्यांनी संशयास्पद निर्णय दिले.त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे त्यांच्याविषयी असलेले ममत्व आता संपुष्टात आले आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत न्यायालयाने २४ नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित केल्या.त्यामुळे आयोगाने काल पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली.आता ही मतमोजणी येत्या २१ डिसें.रोजी होणार आहे.या दरम्यान स्थगित करण्यात आलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीपूर्वी जर मतमोजणी झाल्यास त्याचा परिणाम नव्याने होणाऱ्या निवडणुकांवर होईल,असे स्पष्ट करत न्यायालयाने आज होणारी मतमोजणी स्थगित केली.वास्तविक न्यायालयाने असा निर्णय देण्यापूर्वी सुनावणी दरम्यान आयोग व राज्यसरकारने यामधील अडचणीकडे न्यायालयाचे लक्ष वेधणे,गरजेचे होते.पण गेल्या काही वर्षात आयोगाचा ढिसाळ कारभार लक्षात घेता,त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणे,म्हणजे स्वतःचा कपाळमोक्ष करून घेण्यासारखे आहे.आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मगरीचे अश्रू ढाळत आहेत.राज्यसरकारने सुनावणी दरम्यान न्यायालयात आपले म्हणणे मांडायला हवे होते.पण,त्यांनी आयोग व न्यायालयाच्या निर्णयाविषयी केवळ नापसंती व्यक्त करण्यात धन्यता मानली.भारतीय संविधानात निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय,या दोन्ही संस्थांना अनन्यसाधारण महत्व असताना,त्यांनी अशाप्रकारे वागावे,हे न्यायाला धरून नाही.या २४ नागरपरिषदांच्या निवडणुका स्थगित करणे व झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलणे,ही बाब मतदारांच्या मूलभूत अधिकाराची एकप्रकारे पायमल्ली करण्यासारखे आहे.पण गेल्या काही वर्षात या दोन्ही संस्थाचे अनेक निकाल वादग्रस्त ठरले आहेत,त्यामध्ये आता आणखी एका निकालाची भर पडली आहे.

