दीपक मोहिते,
२ डिसें.नंतर काय होणार ?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आज होणाऱ्या निवडणुकांपैकी काही नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणूकाना,निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.आयोगाच्या या निर्णयाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अंगाची लाही लाही झाल्याचे पाहायला मिळाले.त्यांनी आयोगावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे.आपल्या मनाविरुद्ध एखादा निर्णय झाला की भाजपचे नेते चवताळून उठतात.त्यांची आयटी टीम लगेच कामाला लागते.आपण वाटप केलेला पैसा वाया गेला म्हणून हा थयथयाट झाला असावा,अशा संशयाला जागा आहे.या निवडणुकीत कोटी कोटीची उड्डाणे झाली,मालवण येथे जे काही महाभारत घडले,त्यावरून यापुढे काहीही होऊ शकते,अशी आपली धारणा झाल्यास,ते चुकीचे ठरू नये.मालवणच्या निवडणुकीत मतदारांना वाटप करण्यासाठी त्या शहरातील आठ ते दहा घरात प्रत्येकी २५ लाख रु.देण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाचे आ.निलेश राणे यांनी केला आहे.ते आरोप करून थांबले नाहीत,तर त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून सप्रमाण दाखवूनही दिले.
महायुतीमधील घटक पक्षाच्या आमदाराने,भाजप निवडणुकीत पैसे वाटप करतो हे दाखवून दिल्यामुळे भाजप पार हडबडून गेला आहे.आ.निलेश राणे यांचे लहान बंधू मंत्री नितेश राणे यांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला,पण तो लोकांना पटणारा नव्हता.याप्रकरणी निवडणूक व पोलीस यंत्रणेने ज्या व्यक्तीच्या घरात पैश्याचे घबाड सापडले,त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा होता.पण पोलिसांनी आ.निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला.त्यांच्यावर संबधित व्यक्तीच्या बेडरूममध्ये घुसखोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.या घटनेवरून भाजप सर्व संस्था काबीज करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो,हे स्पष्ट झाले.घडलेल्या या घटनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आ.निलेश राणे यांचे वडील भाजपचे खा.नारायण राणे यांनी आपल्या तोंडातून अवाक्षर काढले नाही.उलट खा.नारायण राणे काय म्हणाले पहा जरा,ते म्हणाले,माझ्या विजयात रविंद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.निवडणुकीच्या काळात ते दिवसरात्र काम करत होते.रवि हा प्रचंड मेहनती आहे.दुसरीकडे मंत्री नितेश राणे यांनी कोणीतरी आ.निलेश राणे यांचा वापर करत असावा,असा संशय व्यक्त करत वेळ मारून नेली.दरम्यान रविंद्र चव्हाण यांनी मात्र,मी २ डिसें.पर्यंत प्रतिक्षा करणार असल्याचे स्पष्ट करत,शिंदे यांना लवकरच वादळ घोंगावणार असल्याचे संकेत दिले आहेत.हा इशारा दिल्यानंतर अवघ्या २४ तासात शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आ.शहाजी बापू पाटील व हिंगोलीचे आ.संजय बांगर यांच्या घरावर व कार्यालयांवर पोलिसांच्या धाडी पडल्या.हा घटनाक्रम लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महायुतीमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे.या निवडणुका जिंकल्यानंतर भाजप हा शिंदे गटाला त्यांची जागा दाखवून देण्याच्या तयारीत आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही संधी सोडत नाहीत.त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यातही फडणवीस सतत ढवळाढवळ करत असतात.शिंदे यांनी प्रस्तावित केलेल्या अनेक विकासकामाना फडणवीस यांनी कात्री लावली आहे.त्यांच्या मंत्र्यांना आपल्या पसंतीचे ओएसडी व खाजगी सचिव देखील फडणवीस यांनी नेमु दिले नाहीत.दुसरीकडे अजित पवार मात्र आपल्याला जे काही मिळाले आहे,त्यामध्ये समाधान मानून फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीला मुकसंमती देत असतात.त्यांच्या मुलांचे जमिनीचे प्रकरण उकरून
काढण्यामागे कोण आहे ? हे तूम्हा आम्हाला सांगायला नको.समाजसेविका अंजली दमानिया यांना सरकारी दस्ताऐवज कसे सहजगत्या मिळतात,हे लपून राहिलेले नाही.या दमानिया यांनी छगन भुजबळ व एकनाथ खडसे यांना चांगलेच जेरीस आणले होते.यापुढे एकनाथ शिंदे व कालांतराने अजित पवार यांचीही अशीच अवस्था झाल्यास आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये. या निवडणुकांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे.या दोघांचे पंधरा ते वीस आमदार गळाला लावून भाजप राज्यात एकहाती सत्ता स्थापन करेल,अशी चर्चा आतापासूनच मंत्रालयात सुरू झाली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा भाजपचा निर्णय बरेच काही सांगून गेला.

