दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
निवडणुकीच्या प्रचारावर यंदा सोशल मीडियाचा मोठा प्रभाव,इतर माध्यमात मात चिंतेचे वातावरण…
ग्रामीण भागात नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार धूमधडाक्यात सुरु असून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी यावेळी प्रचारात प्रसिद्धी करण्यासंदर्भात वारेमाप खर्च करण्याचे टाळले आहे.त्यांच्या आयटी टीमने प्रचारासाठी सोशल मीडियाचा चांगला आधार घेतला आहे.तर अनेक उमेदवार फेसबुक,व्हाट्सअप, इंस्टाग्राम,इ.चा बेमालूम वापर करत आहेत.या माध्यमातून उमेदवार स्वतः थेट मतदारांशी संवाद साधत आहेत.त्यामुळे पैसा व वेळेची चांगलीच बचत होत आहे.प्रचार संपण्यास आता अवघे ३६ तास उरले आहेत.या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद,पंचायत समित्या व त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.या सर्व निवडणुकीत उमेदवाराच्या प्रचाराचा फोकस ” परिसर विकास व सर्वंसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या व प्रश्न,” यावर राहणार आहे. या निवडणुकीतही सोशल मीडियाचा मोठ्याप्रमाणात वापर होणार आहे.
या सर्वं धामधूमीत सर्वसामान्य करदाते देखील आपले हक्क व अधिकार अबाधित राहावेत,यासाठी उमेदवाराकडून अपेक्षा व्यक्त करू पाहताहेत.त्यासाठी त्यांनी नागरिकांची हक्काची सनद तयार केली आहे.ती खालीलप्रमाणे आहे :-
शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालये महानगरपालिकेकडे कधी हस्तांतरीत होणार ? हस्तातरण प्रक्रियेत कोणत्या अडचणी आहेत.
महानगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याची डागडुजी,दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचा मुहूर्त कधी ? वर्षानुवर्षे अशीच लूट होत राहणार का ?
शहरातील करदात्यांना दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा कधी उपलब्ध होणार ? ” आपला दवाखाना,” योजनेची सद्यस्थिती पाहता,ही व्यवस्था फार काळ चालणार नाही,असे करदात्यांना वाटते ? त्यामध्ये किती तथ्य आहे ?
शहरातील पाच उड्डाणपूल व रिंगरुट रखडण्यामागची नक्की कारणे काय होती ? महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे मान्य केले होते,पण त्यासंदर्भात आवश्यक असलेला प्रस्ताव का पाठवला गेला नाही.
लघुपाटबंधारे विभागाच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती,पण योजना तसूभरही पुढे सरकल्या नाहीत,यामागची नेमकी कारणे काय आहेत ? व त्या निधीचे पुढे काय झाले ?
” भूमिगत वीजवाहिन्या, ” या कळीच्या मुद्द्याचे काय झाले ? मतदारांना फसवण्याचे पाप नेमके कोणी केले ?
अंतर्गत रस्ते वारंवार का फुटतात ? डांबर चोरणारे कोण ? त्यांना कोणाचे संरक्षण आहे ?
नालेसफाई न करता ठेकेदार आपली बिले कशी काढतात ? अशी बिले काढणाऱ्या अलीबाबा आणि ४० चोरांच्या टोळीत कोणकोण आहेत.सध्या अलीबाबा इडीच्या कोठडीतून बाहेर आला आहे.इतर ४० चोर कधी आत जाणार ?
बाजार कर व कचरा उचलणे,ठेकेदारांच्या बँक खात्याची चौकशी कधी होणार ?
रस्त्याचे खड्डे बुजवणे व पॅचवर्कचे टेंडर्स कोणाला दिली जातात व करदात्याच्या दरवर्षी किती पैश्याची उधळपट्टी होत असते.
बेनामी नावाने ठेके घेणारे कोण आहेत ? हे आम्हा करदात्यांना कळले पाहिजे,कारण तो आमचा अधिकार आहे.
यासर्व प्रश्नांची उत्तरे या भावी नगरसेवकानी दिली पाहिजेत.

