दीपक मोहिते,
” कुरुक्षेत्र,”
वसई – विरार उपप्रदेशात महाविकास आघाडीचे नाणे चालणार नाही…
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.त्यामुळे राजकीय क्षितिजावर हालचालींना वेग आला आहे.शहरी व ग्रामीण भागात आपले पाय घट्टपणे रोवण्यासाठी राजकीय पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात.राज्यस्तरावर युती व आघाड्या होत असल्या तरी स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या प्रयत्नात असतात.कारण,प्रत्येक पक्षाला सत्तेत वाटेकरी नको असतो.युती व आघाड्या झाल्यास जागावाटपात त्यांच्या वाट्याला अपेक्षित असलेल्या जागा मिळत नाहीत.त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत.
एकीकडे अशी परिस्थिती असताना उद्धव व राज,हे ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र येत आहेत.त्यांची युती फार काळ टिकेल,असे वाटत नाही.राज यांना उद्धव ठाकरे यांनी जवळ केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीपासून फारकत घेणार आहेत.राज यांच्या पक्षामुळे इतर भाषिक आपल्यापासून दुरावतील,अशी भिती त्यांना वाटते आणि त्यांना ही भिती वाटणे साहजिकच आहे,कारण,महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा ही आलीच पाहिजे व त्यांनी मराठीतच बोलले पाहिजे,असा या दोघांचा अट्टाहास आहे.त्यांच्या या अट्टाहासामुळे गुजराती,मारवाडी,
दाक्षिणात्य व जैन हे समाज महाविकास आघाडीऐवजी भाजपकडे वळतील,अशी त्यांना भिती वाटते.त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर केले आहे.हे सर्व रामायण घडत असताना वसई – विरारमध्ये यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी,दुभंगणाऱ्या या महाविकास आघाडीमध्ये सामील झाला आहे.हा प्रकार बविआच्या अंगलट येणारा आहे.महाविकास आघाडी दिवसेंदिवस क्षीण होत असताना त्यामध्ये सामील होणे,हा प्रकारच मुळी ” अचाट शक्तीचा,अफाट प्रयोग,” असा आहे.यामागे हितेंद्र ठाकूर यांचे कोणते लॉजिक आहे,याचा उलगडा मात्र होत नाही.उत्तर भारतीय व गुजराती समाजाच्या मतपेटीवर भाजपने पूर्णपणे कब्जा केला असताना महाविकास आघाडी सोबत जाणे,हे एकप्रकारचे धाडसच म्हणावे लागेल.ज्या कोणी त्यांना असा सल्ला दिला असेल,त्यांनी ठाकूर यांना अडचणीत आणायचे ठरवले असावे.वास्तविक बुडणाऱ्या जहाजात सहसा कोणी प्रवास करायला तयार नसतो,त्यामुळे ठाकूर यांच्या धाडसाचे कौतुकच करावे लागेल.महाविकास आघाडीची वसई विरार परिसरात फारशी ताकद नाही,त्यामधील घटक पक्षांना आजवर एकही निवडणूक जिंकता आली नाही.काँग्रेसचा एक आर्थिकदृष्ट्या वजनदार नेता भाजपच्या वाटेवर आहे.त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली भरघोस मते या निवडणुकीत भाजपकडे वळतील.त्यामुळे बविआचा हा निर्णय स्वतःचा कपाळमोक्ष करुन घेणारा आहे.

