दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
स्था.स्व.सं.च्या निवडणुकांमध्ये ” ठाकरे ब्रँड,” टिकणार का ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत ” ठाकरे ब्रँड,” टिकणार की नाही,हे ठरणार आहे.त्यामुळे उद्धव व राज ठाकरे,या दोघांचे या निवडणुकीत सर्वस्व पणाला लागणार आहे.ज्या बाळासाहेब ठाकरे या ब्रँडमुळे राष्ट्रीकृत बँका, रेल्वे व सरकारी आस्थापनामध्ये मराठी माणूस पाहायला मिळतो,तो भविष्यात
दिसेल का ? असा प्रश्न साहजिकच मराठी माणसाच्या मनात आता उभा राहू लागला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाने जे स्वप्न उराशी बाळगले होते,ते तत्कालीन नेत्यानी आपले अथक प्रयत्न तसेच १०५ हुताम्यांच्या बलिदानाने मिळवून दिले. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे,प्र.के.अत्रे,थोर समाजवादी नेते एसेम व अन्य नेत्यानी त्यावेळी झालेल्या संघर्षात आपल्या प्राणाची बाजी लावली व त्यांच्यासमोर केंद्रातील सरकारला झुकावे लागले.त्यानंतर १ मे १९६० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी मंगल कलश आणला.त्यानंतरच्या काळात प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे यांनी पाच दशके मराठी माणसाचे हक्क व अस्मिता जपण्यासाठी आपले प्रचंड संघर्ष केला व ठाकरे ब्रँड काय असतो हे दाखवून दिले.त्यांच्यामुळे आज अनेक केंद्रीय विभागात मराठी माणूस पाहायला मिळतो.बाळासाहेब,हे केवळ मराठी माणसाला सरकारी सेवेत रोजगार मिळाला पाहिजे,यावर थांबले नाहीत.तर खाजगी कंपन्यातही मराठी माणसाला रोजगाराच्या संधी मिळाल्या
पाहिजेत,म्हणून कायम सक्रिय राहिले.त्यावेळी बाळासाहेबांनी जे शिवधनुष्य उचलले व पूर्ण ताकदीने पेलले,त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे.पण,त्यांचे चिरंजीव व पुतण्याला गेल्या तेरा वर्षात ते शिवधनुष्य पेलता आले नाही.त्यांची कुवत लक्षात आल्यानंतर पूर्वीच्या शक्ती आता पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.त्यामुळे या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे या नावाच्या ब्रँडची अग्निपरीक्षा होणार आहे,तसेच मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रात मराठी अस्मिता टिकून राहील का ? याविषयी मराठी माणसाच्या मनात संभ्रमावस्था आहे.म्हणून महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका,या मराठी माणसाचे हक्क व मराठी अस्मितेसाठी महत्वाच्या ठरणार आहेत.

