दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने विरोधकांना घेरण्यास सुरुवात केली..
महंगारपालिकेचे बिगुल अद्याप वाजले नसताना भाजपने आपल्या विरोधकांच्या बदनामीचा भोंगा वाजवण्यास सुरुवात केली आहे.बहुजन विकास आघाडीच्या एका नेत्यांचे जुने जमीन हडप प्रकरण उजागर करून भाजपने आपल्या प्रमुख विरोधकाला अडचणीत आणले आहे.या पहिल्या दणक्यानंतर आणखी काही नेते त्यांच्या रडारवर आहेत.कोट्यवधी रु.ची सरकारी जमीन या माणसाने कशी हडप केली व त्यावर कारवाई कशी होत नव्हती,हे परवा रात्री चार जणावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वसईकर जनतेला कळले.
या जमीन हडप प्रकरणी वसई विरार शहर महानगरपालिकेचे दोन माजी आयुक्त,नगर रचनाकार व अन्य एक जण,अशा चार जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.गेल्या तीन ते चार दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या आणि
पोलीस यंत्रणेने सलग तपास करून या प्रकरणी गुन्हे दाखल केले,यावरून भाजप,निवडणुकीच्या तोंडावर कामाला लागल्याचे स्पष्ट होत आहे.तसा आरोपही करण्यात येत आहे.मात्र या जमीन हडप प्रकरणात तथ्य आहे.पोलीस ठाणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी आरक्षित असलेली जमीन हडप होते व त्यावर आलिशान बंगला डौलात उभा राहतो,हे सारे विस्मयजनकच आहे.आजवर या वसई तालुक्यात हजारो अनधिकृत चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या.नालासोपारा शहरात डंपिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या.त्यामध्ये राहणाऱ्या गोरगरीब लोकांचे संसार रस्त्यावर आले.पण पोलिसांच्या जमीन हडप प्रकरणी प्रकरणी गेले २५ वर्षे कारवाई होत नाही,यावरून आपली व्यवस्था किती सोडलेली आहे,हे स्पष्ट होत आहे.हे चांगले लक्षण नाही.सरकारी यंत्रणेतील अधिकारी व समाजकंटक यांच्या मिलीभगत असल्याशिवाय ते शक्य होऊ शकत नाही.पुण्यात अजित पवार यांचा दिवटा पोर देखील,जमीन हडप प्रकरणी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागे अंजली दमानिया यांचे शुक्लकाष्ट लावण्यामागे कोण आहे हे वेगळं सांगायला नको.वसईतील हे प्रकरण देखील तसेच आहे.या प्रकरणातील प्रमुख आरोपी एका बड्या नेत्याचा जिवलग मित्र आहे.
निवडणुकीच्या तोंडावर वर्षानुवर्षे दडपण्यात आलेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढून आपल्या प्रमुख विरोधकाला जेरीस आणले आहे.या सर्व घडामोडीनंतर भाजप आता आणखी दोघांना घेरण्याच्या तयारीत आहे.पोलीस जमिनीच्या प्रकरणात जी व्यक्ती प्रमुख आरोपी आहे,तो विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचा निकटवर्तीय आहे,म्हणून पहिली कुऱ्हाड त्याच्यावर पडली आहे.या प्रकरणी दोषी असलेल्या दोन सनदी अधिकाऱ्यापैकी एक माजी आयुक्त यापूर्वीच जेलची हवा खाऊन आला आहे.आता या लोकांच्या बाबतीत पोलीस कशी भूमिका घेतात,याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.

