दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पालघर जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षाच्या वेगवेगळ्या चुली,
गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेले प्रथितयश व एकूण २८८ जागांपैकी १२० जागांवर भाजपला चांगले मताधिक्य मिळाले.ते लक्षात घेऊन भाजपने अवघ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत देण्यास सुरुवात केली होती.त्यानुसार त्यांनी आता पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.मुंबई,ठाणे,भिवंडी, नवी मुंबई,उल्हासनगर व कल्याण – डोंबिवली व वसई – विरार शहर,या महत्वाच्या महानगरपालिकासह नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याच्या ग्रामीण भागात भाजपची ताकद काहीशी कमी असून शहरी भागात मात्र भाजपने गेल्या काही वर्षात चांगलेच पाय रोवले आहेत.शहरी भागातील मतदार,प्रत्येक निवडणुकीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो,असा अनुभव असल्यामुळे त्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ” एकला चलो रे,” ची भूमिका स्विकारली आहे.यापुढे सत्तेत इतर कोणी वाटेकरी नको,त्यामागे त्यांचा छुपा अजेंडा आहे.
त्यांच्या या धोरणानुसार भाजपने पालघर जिल्ह्यातील पालघर,डहाणू व जव्हार,या तीन नगरपरिषदा व वाडा नगर पंचायतीमध्ये स्वबळावर लढण्याचा प्रयोग तडीस नेला आहे.पालघर जिल्ह्यात भाजपचा सातत्याने विस्तार होत आहे.त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत आपली वेगळी चूल मांडली आहे.पालघर जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बऱ्यापैकी पकड आहे.ती मोडून काढण्यासाठी भाजपने या निवडणुकीत शिंदे गटापासून फारकत घेतली आहे.त्याचे दृष्यपरिणाम निकालाच्या दिवशी पालघरवासीयांना पाहायला मिळणार आहेत.भाजप हा सत्ता मिळवण्यासाठी लहान सहान पक्षांना सोबत घेतो,त्यानंतर पक्षाचे पाय रोवले की त्या पक्षांना झिडकारतो.पालघर जिल्ह्यात सध्या हेच पाहायला मिळत आहे.पण शिंदे गटाने डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीत बऱ्यापैकी झटका दिला आहे.या निवडणुकीत शिंदे गटाने अजित पवार व शरद पवार गटाशी हातमिळवणी करत त्याच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत रजपूत यांच्या तोंडाला फेस आणला आहे.भाजपने आपल्याला नामोहरम करण्याचे ठरवले आहे,हे लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे डाव उधळवून लावण्यासाठी आता कंबर कसली आहे.

