दीपक मोहिते,
प्रगल्भ लोकशाही
भारतीय संविधान ; पाच दशकानंतर पुन्हा ढग जमू लागले आहेत…
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हें.रोजी भारतभर साजरा करण्यात येत असतो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हें.१९४९ रोजी संविधान सभेने स्विकारला.त्यामुळे २६ नोव्हें. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.परंतु आता पाच दशकानंतर पुन्हा काळे ढग जमु लागले आहेत.त्यामुळे भारतीय जनतेने सजग राहण्याची गरज आहे.
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ हा ” भारतीय संविधान दिन,” साजरा केला जातो.भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हें.२०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला होता.संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हें.हा दिवस ” संविधान दिन,” म्हणून साजरा करण्यात येत असतो.महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हें. २००८ रोजी आदेश काढून ” २६ नोव्हें, ” हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.त्यानुसार हा संविधान दरवर्षी साजरा करण्यात येत असतो.यावर्षी या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली.
२६ जाने.१९५० रोजी हे संविधान अमलात आल्यापासून २०१८ सालापर्यंत संविधानात एकूण १०४ दुरुस्त्या करण्यात आल्या.सर्वात पहिली दुरुस्ती ही संविधान अमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९५१ साली झाली होती.भारतीय संविधान दुरुस्तीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडता येते.पण ते राज्याच्या विधानसभेत मांडता येत नाही.या संविधानाने आपल्या देशात लोकशाहीचा पाया अधिक मजबुतपणे रचला.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली घटनादुरुस्ती करून सर्व अधिकार आपल्या हाती घेतले होते.या अधिकाराच्या साहाय्याने त्यांनी देशावर आणीबाणी लादली होती.त्यांच्या या कृतीमुळे देशभरात त्यावेळी सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले होते.त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेने त्यांच्या पाठीला माती लावली व १९७७ साली केंद्रात पहिले बिगर काँग्रेसी जनता दलाचे सरकार स्थापन झाले होते.त्यांनी सत्तेत आल्या आल्या पुन्हा घटना दुरुस्ती करत इंदिरा गांधी यांनी केलेली दुरुस्ती रद्दबातल केली व आणीबाणी उठवली होती.सध्या केंद्रात असलेले राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार देखील घटना बदलण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे.पण याविषयी असलेली तीव्र लोकभावना लक्षात घेता सरकार तशाप्रकारचे धाडस करू शकत नाही.आज भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहे.त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.पण भारतीय संविधानाच्या अवती भवती पुन्हा काळे ढग जमू लागले आहेत,सदर बाब चिंता करण्यासारखी असून संविधानाची मोडतोड करणाऱ्या शक्ती पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.संविधानाला या शक्तींनी नख लावण्याचा प्रयत्न केल्यास १९७५ साली देशात जशी अराजकाची स्थिती निर्माण झाली होती,तशीच स्थिती व पून्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.

