दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
मतदार नोंदणी प्रभावीपणे व्हायला हवी,
२ डिसें.रोजी होऊ घातलेल्या पालघर,डहाणू व जव्हार,या तीन नगरपरिषदा व वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत १ लाख १६ हजार ६६० मतदार आपला हक्क बजावणार आहेत.या चारही शहराची लोकसंख्या लक्षात घेता मतदारांची संख्या इतकी कमी का ? असा प्रश्न साहजिकच मनात उभा राहतो.दरवर्षी राज्य निवडणूक आयोग,राज्यात मतदार नोंदणीचा कार्यक्रम सतत राबवत असतो.” मतदान हे पवित्र काम असून ते पार पाडले पाहिजे,” असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत असते.पण,आयोग या महत्वाच्या आवाहनाचे स्वतः पालन करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही वर्षात रेल्वेला लागून असलेल्या वसई,पालघर व डहाणू तालुक्यात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व या तिन्ही तालुक्याची लोकसंख्या जवळपास १६ लाखाच्या आसपास पोहोचली.वसई तालुका वगळता पालघर व डहाणू या दोन तालुक्याची लोकसंख्या अडीच लाख इतकी असताना या दोन्ही शहराची एकत्रित मतदारसंख्या केवळ ९४ हजार ४२० इतकीच आहे.( पालघर – ५५ हजार ७२७ व डहाणू – ३८ हजार ६९३,) या आकडेवारीवरून निवडणूक आयोग केवळ आवाहन करते व मतदारसंख्या वाढावी,यासाठी प्रयत्नच करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.वर्षातून दोन ते तीन वेळा मोहीम राबवूनही मतदार नोंदणी प्रभावीपणे होत नाही,हे निवडणूक आयोगाचे अपयशच म्हणावे लागेल.
दुसरीकडे डोंगरी भागात असलेल्या जव्हार व वाडा मतदारसंघातील मतदारांची संख्या पाहता निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी कशाप्रकारे होते,यावर प्रकाश पडतो.या दोन्ही शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे.पण या तालुक्याच्या शहराची एकत्रित मतदारसंख्या आहे,केवळ २२ हजार २४० ( जव्हार – ९ हजार ३४७ व वाडा १२ हजार ८९३,) ही आकडेवारी पाहता,या चार शहरात आयोगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला नाही,असे स्पष्ट झाले आहे.लोकांना केवळ आवाहन करून किंवा होर्डिंग्ज लावून किंवा बॅनरबाजी करून मतदार वाढत नसतात,तर त्यासाठी मतदार नोंदणी प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.

