दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
एकत्र येण्याचा निर्णय स्वागतार्ह,पण ” उशिराने सुचलेले शहाणपण,”
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाले आहे.त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याचे वर्णन उशिराने सुचलेले शहाणपण,” असेच करावे लागेल.गेली अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणारे हितेंद्र ठाकूर व उद्धव ठाकरे हे भाजपला रोखण्यासाठी या निवडणुकीत एकत्र आले आहेत.त्यांच्यासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या आघाडीत सामील होण्याची शक्यता फार कमी आहे.कारण त्यांचा मनसेला सोबत घेण्यास तीव्र विरोध आहे.मनसे सोबत आली तर गुजराती,मारवाडी,जैन,
मुस्लिम व दाक्षिणात्य मतदार आपल्यापासून दुरावतील,अशी भिती काँग्रेसजनांना वाटत आहे. ही भिती रास्तच आहे.मराठी भाषेची सक्ती व हिंदी भाषा लादण्यास विरोध,अशा दोन विषयी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना/ मनसे यांच्यामध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद आहेत.तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून अन्य भाषिकांना होणारी मारहाण त्यांना मान्य नाही.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या नव्याने होऊ घातलेल्या आघाडीत सामील होण्याची शक्यता नाही.
वास्तविक गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेशी हातमिळवणी केली असती तर आज वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांना ०६ लाख १ हजार २४४ मते मिळाली.तर शिवसेनेच्या भारती कामडी यांना ४ लाख १७ हजार ९३८ मते मिळून त्यांचा १ लाख ८३ हजार ३३६ मतांनी पराभव झाला.या निवडणुकीत बविआच्या उमेदवाराला २ लाख ५४ हजार ५१७ मते मिळाली.या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आपला उमेदवार उतरवला नसता तर भाजपला ही निवडणूक गमवावी लागली असती.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांना ७७ हजार २७९ तर हितेंद्र ठाकूर यांना ७४ हजार ०४ मते मिळाली व त्यांचा केवळ ३ हजार २७५ मतांनी पराभव झाला.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांनी या निवडणुकीत ६१ हजार ८७४ मते मिळाली.या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना मतविभागणीचा चांगलाच फायदा झाला.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ही निवडणूक लढवली नसती तर हितेंद्र ठाकूर या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी झाले असते.या सर्व अनुभवावरून उद्धव ठाकरे व हितेंद्र ठाकूर या दोघांनी महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो नक्कीच स्वागतार्ह असाच आहे.पण हा निर्णय कितपत फलदायी ठरतो,हे आता सांगणे कठीण आहे.मनसेला जर सोबत घेतले तर अन्य भाषिक समाज या नव्याने होऊ घातलेल्या आघाडीपासून दूर जातील व त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

