दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
… तर एकनाथ शिंदे व अजित पवार गटाचे काही खरं नाही…
एकनाथ शिंदे यांची हतबलता आणि अजित पवार यांची बिकट अवस्था लक्षात घेता,या दोघांची भाजप सोबत असलेली सोयरीक फार काळ टिकेल,असं वाटत नाही.भाजपसोबत जाण्याचा निर्णय ” हात दाखवून अवलक्षण ” करून घेण्यासारखा होता.आज भाजपने या दोघांची अवस्था ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी करून टाकली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर भाजप या दोघांच्या हाती नारळ देईल,अशी शक्यता आहे.त्यावेळी शिंदे व पवार या दोघांनाही कळून चुकेल की स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आपण हे काय करून बसलो.इतकी वर्षे राजकारणात सक्रिय असूनही शिंदे व पवार या दोघांना फडणवीस यांची चाल ओळखता आली नाही,असे म्हणता येणार नाही.आपण केलेले प्रताप हे आपल्याला जेलवारी घडवू शकतात,हे लक्षात घेऊन त्यांनी भाजपच्या मांडवाखाली जाण्याचा निर्णय घेतला,पण त्यांचा हा निर्णय आता आत्मघाती ठरू पाहत आहे.
ईडी व अन्य तपास यंत्रणांच्या भितीमुळे सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांना धोका दिला.भाजपने शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून झालेल्या अपमानाचा बदला घेतला.त्यावेळी शिंदे सोबत असलेले अनेक मंत्री,आमदार व खासदार देखील तपास यंत्रणांच्या रडारवर होते,त्यांनीही भितीपोटी शिंदे यांना चांगलीच साथ दिली,त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले.या घडामोडीनंतर भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले,त्यामुळे शिंदेसह त्यांचे सर्व सहकारी चांगलेच सुखावले.अनेकांना लाभाची पदे मिळाली,बऱ्यापैकी अर्थाजन सुरू झाले.दरम्यान भाजप व शिंदे गटाने सेनेचे नाव व निवडणूक चिन्ह पळवले.विधानसभा अध्यक्षांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवत त्यांच्या या कृतीला मान्यता दिली.पण उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.सदर प्रकरण न्यायालयात आजही प्रलंबित आहे.या प्रकरणाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल,याची कल्पना असल्यामुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडायचे ठरवले व अजित पवार यांचे ७० हजार कोटी रु.चा ( जलसंपदा व महा.राज्य सह.बँक आर्थिक गैरव्यवहार ) घोटाळा उकरून काढण्याचे संकेत दिले.त्यामुळे अजित पवार यांचे धाबे दणाणले व त्यांनी आपल्या काकांचा पक्ष फोडला.भाजपने त्यांनाही लाभाची पदे दिली.अशाप्रकारे त्यांच्यामागे लावणारा तपास यंत्रणांचा ससेमिरा थांबला.सर्व काही व्यवस्थित सुरू होते.शिंदे यांच्या उठसुठ दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या.गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची जवळीक वाढली.वारंवार भेटीगाठी होऊ लागल्या.याच भेटीगाठी त्यांच्या जीवावर उठल्या,विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी या दोघांना त्याना भाजपच्या तुलनेत जागा मिळू दिल्या नाहीत.या निवडणुकीत तीनही पक्षाला नजरेत भरतील,इतक्या जागावर विजय मिळाला.पण भाजपने या निवडणुकीत १३६ जागा जिंकून बाजी मारली.त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेले.शिंदे यांच्या पुन्हा दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या,पण फडणवीस यांच्या प्रभावासमोर त्यांचे काही एक चालले नाही.त्यामुळे त्यांना नैराश्य आले व त्यांच्या सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे गावाच्या वाऱ्या सुरू झाल्या.अशाप्रकारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांची गेल्या पाच वर्षात वाताहत करण्यात भाजपने यश मिळवले.आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केली आहे.गेली अनेक वर्षे उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका,एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली ठाणे महानगरपालिका व
अजित पवार यांचे अधिराज्य असलेली पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी
भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याची रणनिती आखली आहे.अधून मधून शिंदे व अजित पवार गटातील लोकांच्या भानगडी व कुलंगडी ज्या बाहेर येत आहेत,त्यामागे भाजप असून या निवडणुकी दरम्यान या दोन्ही गटाला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.तो काही प्रमाणात यशस्वीही होत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर भाजपला लक्षणीय यश मिळाले तर मात्र शिंदे व पवार गटाचे काही खरं नाही…

