दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडी चमकदार कामगिरी करू शकणार नाही…
बहुजन विकास आघाडी,अखेर महाविकास आघाडीमध्ये सामील झाली.वाडा नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका ते एकत्रितपणे लढणार आहेत.पण या आघाडीमध्ये मनसेला सामावून घेतले की कसे,याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही.कारण पालघर येथे झालेल्या बैठकीत मनसे सहभागी झाला नव्हता.जर मनसे सहभागी झाला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका काय असेल,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) शिवसेना ( उबाठा ) बहुजन विकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँगेस,या घटक पक्षाची धुरा ज्या पदाधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे,त्यांच्या कारकीर्दीवर एक नजर टाकणे जरुरीचे ठरते.कारण,चार पैकी तिघांना गेल्या पाच वर्षात आपल्या निवडणुका जिंकता आल्या नाहीत.राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हरिश्चंद्र भोये यांच्याकडून पराभव पत्करावा लागला,बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे देखील शिवसेनेचे ( शिंदे गट ) विलास तरे यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभूत झाले.तर शिवसेनेचे ( उबाठा ) उत्तम पिंपळे यांनाही पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पालघर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील,यानी गेल्या काही वर्षात कोणतीही निवडणूक लढवली नाही.काही वर्षांपूर्वी त्यांनी कुणबी सेनेच्या तिकिटावर पंचायत समितीची निवडणूक लढवली होती,त्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.त्यावेळी त्यांच्या गळ्यात पंचायत समितीच्या सभापतीपदाची माळ पडली होती.गेल्या वर्षी त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जिल्हाध्यक्षपद दिले.पण,गेल्या वर्षभरात ते पक्षाला उभारी देऊ शकले नाहीत.अशा सर्व परिस्थितीमध्ये नव्याने आकाराला आलेली ही आघाडी,नगरपंचायत,
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत चमकदार कामगिरी करू शकणार नाही.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ( उबाठा ) राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज होती.पण ज्यांच्याकडे सध्या धुरा सोपवण्यात आली आहे,ते सारे नेते कायम निष्क्रिय राहिले.या आघाडीतील शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्ह्यात थोडेफार अस्तित्व टिकून आहे.साडेतीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अनेक स्थानिक नेते गळाला लावल्यामुळे जिल्ह्यावरील त्यांची पकड सैल झाली.आजही त्यांचा पक्ष स्वतःला सावरू शकलेला नाही.बहुजन विकास आघाडीला काही किरकोळ ग्रामपंचायती वगळता पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद,पंचायत समित्या,नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये डोळ्यात भरेल,अशी कामगिरी करता आली नाही.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्ष पार ढेपाळला,तो अद्याप सावरलेला नाही.राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील अवस्था अत्यंत दयनीय असून त्यांचा गेल्या अनेक वर्षात जव्हार व मोखाडा पलीकडे विस्तार होऊ शकला नाही.लोकांशी संपर्क नाही,जिल्हा विकासाबाबत आस्था नाही,पक्षाची बांधणी नाही,त्यामुळे निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारांची उणीव,अशा परिस्थितीमुळे महाविकास आघाडीची ही मोट आजच्या घडीला विस्कळीतच आहे.ती या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकणार नाही.

