दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो…
बिहार राज्यातील निवडणुकांचा निकाल येत्या १४ नोव्हें.रोजी लागणार आहे.हा निकाल कसा असेल,यावर विविध संस्थांनी आपले एक्झिट पोलही जाहीर केले आहेत.ते किती खरे ठरतात,हे उद्या पहिल्या दोन तासात होणाऱ्या मतमोजणीतुन स्पष्ट होणार आहे.
बिहार राज्यात भाजप व नितीशकुमार यांच्या जनता दल ( निरपेक्ष ) यांच्या समोर जनसुराजचे प्रशांत किशोर व राजदचे तेजस्वी यादव यांनी प्रचंड आव्हान उभे केले आहे.भाजप व जेडीयु यांच्या युतीला खरा धोका प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे असून,या निवडणुकीत भाजप व जेडीयु युतीचा पराभव झाल्यास त्याचे पडसाद देशभरात उमटण्याची शक्यता आहे.मात्र या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो,त्यामुळे बिहारच्या निवडणुकीकडे देशवासीयांचे विशेष करून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.

राज्यात जाने.किंवा फेब्रु.महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ( महानगरपालिका ) निवडणुका होणार आहेत.त्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालवली आहे.” दुबार मतदार व मतचोरी,” हे दोन नवीन मुद्दे यंदा प्रचारात चांगलेच गाजणार आहेत.या निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये सरळ लढत होईल,असे वाटत असतानाच जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या वेगवेगळ्या चुली मांडण्याची तयारी चालवली आहे.सत्तेमध्ये मोठा वाटा आपल्या मित्रपक्षाला मिळू नये,यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न आहेत. मुंबई,ठाणे व पालघर या तीनही जिल्ह्यात अन्य राजकीय पक्षाचे वर्चस्व निर्माण होऊ नये,यासाठी भाजप चांगलाच सक्रिय झाला आहे.दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मनसे सारख्या पक्षाला सोबत घेतल्यास आपल्याला फटका बसू शकतो,अशा भितीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यांना महाविकास आघाडीमध्ये सोबत घेण्यास विरोध करत आहे.

त्यामुळे निवडणुकीत होणाऱ्या मतविभागणीचा फायदा कोणाला होईल,हे सांगणे जरा कठीणच आहे.ही निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी भाजप मात्र हळुवारपणे चोरपावले टाकत आहे.भाजपकडून होणारी ही तिरकी चाल लक्षात घेऊन शिंदे व अजित पवार गट देखील आता स्वबळाचा नारा देऊ लागले आहेत.पालघर जिल्ह्यात वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकही भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.भाजपमधील इच्छुक उमेदवारीची झालेली भाऊगर्दी लक्षात घेता,त्यांना शिंदे गटाला फारशा जागा देणे,शक्य होणार नाही.त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणुक भाजप,शिंदे गटासोबत लढवण्यास तयार नाही,समजा त्यांनी शिंदे गटाला सोबत घेण्याचे ठरवले तरी ते शिंदे गटाला फारशा जागा देणार नाहीत.त्यामुळे शिंदे गटाला या निवडणुका स्वबळावर लढवाव्या लागणार आहेत.ठाणे महानगरपालिकेत आजच्या घडीला शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे,त्यांना हद्दपार करण्यासाठी भाजप कुटनीतीचा आधार घेऊ लागला आहे.भाजपचे आ. संजय केळकर हे अधूनमधून स्वबळाचा सूर आळवत असतात.तर दुसरीकडे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या कर्मभूमीत पराभव करण्यासाठी पाण्यात देव टाकून बसले आहेत.त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फूस आहे.या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस,हे विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याऐवजी शिंदे व अजित पवार गटाच्या मुसक्या बांधू पाहत आहेत.मुंबईसह लगत असलेल्या ठाणे व पालघर या तीन महत्वाच्या जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो,याची जाणीव एकनाथ शिंदे यांना असल्यामुळे सध्या ते बघ्याच्या भूमिकेत आहेत.पुण्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दबदबा आहे.त्यांच्याशी थेट पंगा घेण्याऐवजी भाजप अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या भानगडी बाहेर काढू लागला आहे.पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणाची संबधित कागदपत्रे शिवसेनेच्या अंबादास दानवे यांना कोणी दिली ? याचा शोध घेतल्यास भाजपच्या स्ट्रॅटेजीचा अंदाज येऊ शकतो.तसेच या प्रकरणाची ओरड झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने चौकशी समिती नेमणे,या सर्व घडामोडी लक्षात घेता पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतून अजित पवार गटाची उचलबांगडी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत,असे म्हंटल्यास ते वावगं ठरू नये…

